बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सध्या एका वेगळ्या वळणावर आहे. युवासेना अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. करोना संकटाचा हाहाकार असताना महाराष्ट्र सरकारही करोनाचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशात महाराष्ट्र सरकारचे यश अनेकांना खुपते आहे. त्यामुळे सुशांत सिंह प्रकरणात माझ्यावर आणि ठाकरे कुटुंबीयांवर नाहक चिखलफेक केली जाते आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. त्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने ट्विट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत काही प्रश्न विचारले आहेत.

कंगनाने एका पाठोपाठ चार ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये तिने गलिच्छ राजकारणाबद्दल कोण बोलतंय पाहा. तुमच्या वडिलांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कशी मिळाली हा गलिच्छ राजकारणाच्या अभ्यासाचा विषय आहे सर. हे सगळं विसरा आणि सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरं तुमच्या वडिलांना द्यायला सांगा असे म्हटले आहे.

१. रिया चक्रवर्ती कुठे आहे?
२. सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची तक्रार दाखल करुन का घेतली नाही?
३. फेब्रुवारी महिन्यात सुशांत सिंह राजपूतच्या जिवाला धोका आहे, अशी तक्रार करण्यात आली होती. मग मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे का म्हटले?
४. आपल्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट्स किंवा सुशांतच्या फोनचा डेटा का नाही. ज्यामध्ये तो आत्महत्येपूर्वी कुणाशी बोलला हे कळेल?
५. बिहारचे आयपीएस विनय तिवारी यांना क्वारंटाइनच्या नावाखाली लॉक करुन का ठेवण्यात आले?
६. सीबीआय चौकशीसाठी का घाबरतात?
७. रिया आणि तिच्या कुटुंबीयांनी सुशांतचे पैसे का लुटले?

या सर्व प्रश्नांचा राजकारणाशी काही संबंध नाही. कृपया याची उत्तरे द्यावीत असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे असा दावा भाजपा नेते नारायण राणे यांनी केला होता. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप करत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. तसेच सुशांत सिंह प्रकरणात राज्य सरकार कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करते आहे असाही आरोप त्यांनी केला होता.