‘डिअर जिंदगी’ या चित्रपटातील अभिनयासाठी आलिया भट्टचं प्रेक्षक-समीक्षकांकडून खूप कौतुक झालं. मात्र या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी आलिया ही दिग्दर्शिका गौरी शिंदेची पहिली पसंत नव्हती. यासंदर्भातला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आलियाला ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. “तुला ही भूमिका मिळावी यासाठी करण जोहर आणि शाहरुख खानने गौरी शिंदेकडे विनवणी केली अशी चर्चा आहे. हे खरं आहे का”, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.

या प्रश्नाचं उत्तर देताना ‘डिअर जिंदगी’मध्ये आधी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड झाली होती याची कबुली आलियाने दिली. “मला माहितीये की आधी दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार सुरू होता आणि नंतर मला विचारलं जाणार असल्याची चर्चा होती. गौरी शिंदेने माझी भेट घेतली आणि मी लगेच होकार दिला. पण माझ्यासाठी तिच्याकडे कोणी विनवणी केली का हे मला माहित नाही. कधीकधी दिग्दर्शकालाही काही गोष्टी वेगळ्या नजरेतून पाहाव्या लागतात”, असं उत्तर आलियाने दिलं.

आणखी वाचा : दीपिकाने सांगितलं बेडरूम सिक्रेट, म्हणाली “रणवीर रात्री…”

‘डिअर जिंदगी’साठी आलियाच्या आधी कतरिना कैफच्या नावाची चर्चा होती. शाहरुखच्या तुलनेत आलिया वयाने खूप लहान दिसेल म्हणून दिग्दर्शिका गौरी शिंदेने कतरिनाचा विचार केला होता, असं म्हटलं जात होतं. मात्र करण जोहर व शाहरुखने आलियासाठी गौरीकडे विनवणी केल्यामुळे तिला भूमिका मिळाली अशी चर्चा आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही, मक्तेदारी, गटबाजी या मुद्द्यांवरून वाद सुरू झाला आहे. त्यामुळे आलियाच्या मुलाखतीचा हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे.