‘लोकसत्ता’तर्फे आजवर नानाविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. काळाची पावलं ओळखून संवादाच्या नवीन माध्यमांना ‘लोकसत्ता’ने नेहमीच आपलसं केलं आणि म्हणूनच वाचकांनीही त्याला भरघोस प्रतिसाद दिला. याच नवमाध्यामांची ताकद ओळखून आणि वाचकांपर्यंत पोहोचण्याचे सुलभ साधन म्हणून लोकसत्ता ऑनलाइनतर्फे ‘लोकसत्ता लाईव्ह चॅट’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याच उपक्रमाअंतर्गतच आयोजित करण्यात आलेल्या लोकसत्ता लाईव्ह चॅट मध्ये करार या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री क्रांती रेडकर आणि अभिनेत्री उर्मिला कोठारेने हजेरी लावली होती.

उर्मिला आणि क्रांतीने मोठ्या उत्साहाने या लाइव्ह चॅटमध्ये सहभागी होत अनेकांनाच चकित केले. नेटिझन्सनीही त्यांच्या या धम्माल गप्पांमध्ये सहभागी होत या संवादाची रंगत आणखीनच वाढवली. करार या चित्रपटासंबंधीच्या विषयाला छेडत या संवादाला सुरुवात झाली. त्यावेळी क्रांतीने तिच्या बोलण्यातून हे स्पष्ट केले की, ‘करार’ हा चित्रपट सरोगसीवर आधारित नसून सरोगसी हा त्या चित्रपटातील एक भाग आहे.

प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना क्रांती आणि उर्मिला मोकळेपणाने गप्पा मारत होत्या. यावेळी प्रेक्षकांनी उर्मिलाला महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारेविषयीसुद्धा प्रश्न विचारले. महेश कोठारेंना आपण प्रेरणास्त्रोत मानत असून त्यांच्या दांडग्या अनुभवाविषयीसुद्धा उर्मिला यावेळी बोलली. क्रांती रेडकरनेही गप्पांच्या ओघात तिच्या हॉलिवूड प्रवासाविषयी सांगत तिथे चित्रपटांची तयारी कशी होते, तालिम कशा प्रकारे घेतल्या जातात याविषयीही चर्चा केली. प्रेक्षकांनीसुद्धा या दोन्ही अभिनेत्रींवर काही धम्माल प्रश्नांचीही बरसात केली. त्याचपैकी एकाने क्रांतीला तिच्या नकला करण्याच्या स्वभावावरुन अभिनेत्री श्रीदेवीची नक्कल करण्यास सांगितले. क्रांतीनेही फार आढेवेढे न घेता श्रीदेवीची अगदी हुबेहूब नक्कल केली. क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठारे यांनी मोठ्या उत्साहात प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देत फेसबुक लाइव्ह चॅटदरम्यान एकच धम्माल केली. यावेळी गप्पांच्या ओघात बंगळूरु येथे घडलेल्या विनयभंगाच्या प्रश्नावरही क्रांती आणि उर्मिलाने त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या.

मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि क्रांती रेडकर यांनीही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मुलींच्या छोट्या कपड्यांबद्दल त्यांच्यावर बोट ठेवले जात होते याबद्दल लोकसत्ता फेसबुक लाइव्ह चॅटमध्ये बोलताना उर्मिलाने यावेळी आपले मत व्यक्त केले. ती म्हणाली की, बंगळुरुमध्ये जी घटना झाली त्यात मुलीने छोटे कपडे घातले नव्हते. मुला मुलींना लहानपणापासूनच अशा पद्धतीने वाढवलं जातं मुलं मुली वेगवेगळ्या शाळेत शिकतात त्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना एकमेकांबद्दल अधिक कुतुहल वाटायला लागतं. यासाठी लहानपणापासूनच मुला-मुलींना एकमेकांसोबत बोलायला खेळायला दिलं तर ते कुतुहल कमी होतं.

 

तसंच तोकडे कपडे घालण्यावर माझा अजिबात आक्षेप नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुम्ही तोकडे कपडे घालता तेव्हा ते कुठे घालता याचे भान ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या परिसरात असे कपडे वापरता, तिथल्या लोकांची तुम्हाला छोट्या कपड्यात स्वीकारण्याची मानसिकता आहे का याचाही विचार करणे आवश्यक आहे.