अभिनेत्री कंगना रणावतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये कंगणाने राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली असून या चित्रटामधून झाशीच्या राणीची शौर्यगाथा सांगण्यात आली आहे. देशभरातील ३ हजार स्क्रिन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल ८.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर या आकडेवारीमध्ये वाढ होत या चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही तुफान कमाई केल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ‘मणिकर्णिका’च्या कमाईचे आकडे सांगितले आहे.

हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी २६ जानेवारीला या चित्रपटाने १८.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने केवळ दोन दिवसांमध्ये २६.८५ कोटी कमावले आहेत.


त्याप्रमाणेच हा चित्रपट पुढील काही दिवसामध्ये आणखी कमाई करु शकतो अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे. ‘मणिकर्णिका’सोबतच दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६ कोटी रुपयांची कमाई केली होती. खरं पाहायला गेलं तर हे दोन्ही चित्रपट दोन मोठ्या व्यक्तीमत्वावर आधारित आहे. ‘ठाकरे’ हा बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित तर ‘मणिकर्णिका’ झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित. मात्र एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांच्या कमाईच्या आकडेवारीमध्ये ‘मणिकर्णिका’ने ‘ठाकरे’वर मात केल्याचंच एकंदरीत दिसून येत आहे.