करोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. लोकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. या विषाणूमुळे जणू नैराश्येचं वातावरण निर्माण झालं आहे. परंतु अशा वातावरणात सुपरहिरो फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आली आहे. मार्व्हल स्टुडिओने ‘ब्लॅक विडो’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर केली आहे.

कधी होणार ब्लॅक विडो प्रदर्शित?

ब्लॅक विडो ही एक फिमेल सुपरहिरो आहे. ती अॅव्हेंजर्सच्या पहिल्या टीमची सदस्य होती. हॉलिवूड सुपरस्टार स्कारलेट जॉन्सन हिने ही भूमिका साकारली आहे. खरं तर २०१५मध्येच तिच्यावर तिच्यावर एक स्टँड अलोन चित्रपट तयार केला जाणार होता. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प वारंवार रद्द झाला. अखेर प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ‘ब्लॅक विडो’ येत्या सहा नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

‘ब्लॅक विडो’ हा मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या फेस फोर मधील पहिला चित्रपट आहे. यापूर्वी हा चित्रपट २४ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. परंतु करोना विषाणूच्या प्रकोपामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली. मार्व्हल स्टुडिओने ट्विट करुन ही नवी तारीख घोषित केली आहे. यामुळे सुपरहिरो चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक आपला आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत.