|| वेदवती चिपळूणकर

१०५ वर्षांपूर्वी एका कमालीच्या सर्जनशील आणि कल्पक व्यक्तीने संपूर्ण भारताला एक स्वप्न दाखवलं.. रुपेरी आणि मोहक स्वप्न.. त्या काळात त्या व्यक्तीला आणि त्या स्वप्नालाही लोकांनी वेडगळ ठरवलं. मात्र काही अवधीतच त्याच्यासोबत अनेक जण ते स्वप्न पाहू लागले, जगू लागले. पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी ते सगळेच झटू लागले आणि त्या रुपेरी स्वप्नाला सगळ्यांनी पडद्यावर आणलं. स्वत:चंच स्वप्न असल्याप्रमाणे त्या स्वप्नाला हळूहळू लोकांनी स्वीकारलं. कालांतराने ते लोकांच्या अंगात भिनत गेलं, रक्तात धावू लागलं आणि त्याच्याशिवाय राहणं अशक्य वाटू लागलं. ते स्वप्न म्हणजे सिनेमा.. भारतातली एक मोठी इंडस्ट्री! या सिनेमाच्या जगात एकदा तरी वावरायची हौस सिनेमावेडय़ा प्रत्येकाला असते. ‘ड्रीमलॅण्ड’ म्हणता येईल अशी ही बॉलीवूडची दुनिया! प्रत्येकाचा एखादा विशेष आवडता सिनेमा, एखादी आवडती भूमिका, एखादा प्रिय कलाकार आणि त्याच्या जागी आपण असायची दृढ इच्छा असणाऱ्या सिनेमावेडय़ा लोकांसाठी एक दिवस का होईना हे स्वप्न जगणं ही एक मोठी पर्वणीच म्हणायला हवी!

रसिक प्रेक्षकांचं बॉलीवूडवरचं प्रेम आणि आतापर्यंत बॉलीवूडच्या इतिहासात मानबिंदू ठरलेले सिनेमे यांचा संगम साधून प्रेक्षकांना ‘आजचा दिवस माझा’ म्हणण्याची संधी देणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतला मुंबईपासून अवघ्या दीड तासाच्या अंतरावर उभा केला आहे. पन्नास एकराचा विस्तार असलेल्या या प्रकल्पाचं औपचारिक उद्घाटन नुकतंच दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेत्री मानसी नाईक आणि ‘र्फजद’ चित्रपटातील कलाकार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यानिमित्ताने महा-फिल्मोत्सव या सोहळ्याचं आयोजन ‘एन.डी.ज फिल्म वर्ल्ड’मध्ये करण्यात आलं होतं. अवधूत गुप्ते व मधुरा कुंभार यांचे स्वर आणि मानसी नाईकची अदाकारी यांनी या महा-फिल्मोत्सवाची सुरुवात झाली आणिोदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने या फिल्मोत्सवाची सांगता झाली. आतापासून हे ‘एन.डी.ज फिल्म वर्ल्ड’ सर्व रसिकांसाठी खुलं झालं आहे.

‘नितीन चंद्रकांत देसाई’कृत असं नाव पडद्यावर पाहिलं की त्या चित्रपटाच्या भव्यतेची आपल्याला खात्री पटते आणि नयनरम्य देखावे पडद्यावर पाहायला मिळणार याबद्दल उत्सुकता वाटू लागते. ‘लगान’च्या गावापासून ते ‘प्रेम रतन धन पायो’च्या महालापर्यंत सर्व गोष्टी ज्याच्या कल्पनेतून प्रत्यक्षात उतरल्या ते नितीन देसाई! बॉलीवूडमध्ये भव्यदिव्य दुनिया उभी केली ती ‘मुघल-ए-आजम’चा शीशमहल, ‘देवदास’ची हवेली आणि ‘प्रेम रतन धन पायो’च्या रॉयल पॅलेसनी! शीशमहल हे असं एक वास्तवातलं स्वप्न ज्यात प्रत्येकाला स्वत:चं प्रतिबिंब पाहावंसं वाटेल. ‘रॉयल’ या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष ‘रॉयल पॅलेस’चा महाल पाहिल्याशिवाय समजणं केवळ अशक्य! ‘झांसी की रानी’च्या तलवारी, चिलखतं, शिरस्त्राण, भाले, हत्यारं आणि ते उंचच उंच खांब, कमानी आणि मोकळा मोठा दरबार हे सगळं डोळ्यांचं पारणं फेडणारं! जुन्या मुंबईतल्या इमारती, चौकातल्या दिव्याचे कोरीव खांब, ‘मेरवान्स’चं कधीकाळी असलेलं जुन्या सजावटीचं दुकान, मोठमोठी झुंबरं लावलेले कॅफे आणि मुंबईच्या मायानगरीतली अनेक मोहक आकर्षणं मोठय़ांच्या आठवणीतली आणि आताच्या तरुणांनी न पाहिलेली मुंबई दाखवतात. किल्ला, त्याचे बुरुज, मोठमोठय़ा तोफा, जुन्या घडणीची आणि चिऱ्यांच्या बांधकामाची देवळं, संतांच्या मोठमोठय़ा मूर्ती, पाच फूट उंचीच्या राजमुद्रा, महाराजांचा दरबार, राजाचं सिंहासन, राण्यांच्या पालख्या हे सगळं आपल्याला थेट इतिहासात घेऊन जातं.

आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी इथे पाहायला मिळतात त्या म्हणजे फॅशन स्ट्रीट किंवा टॅलेंट स्ट्रीट आणि चोर बाजार! चोर बाजार हा असा एक परिसर आहे, असा एक रस्ता आहे जिथे आपल्याला अपेक्षित नसलेल्या आणि कदाचित माहीतही नसलेल्या वस्तू पाहायला मिळतील. नितीन देसाईंनी आजपर्यंत सेट्स उभारताना वापरलेल्या सगळ्या कलात्मक गोष्टींचं संमेलन या चोर बाजारी भरलेलं आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या काळातल्या दिव्या-पंख्यांपासून ते ट्रकच्या चाकांपर्यंत अनेक गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे टॅलेंट स्ट्रीट जिथे मुंबईच्या प्रसिद्ध फॅशन स्ट्रीटसारखी दुकानं, खाऊ गल्ली वगैरे तर आहेच; पण कलात्मक अशा काही वस्तू, पुतळे, चित्रं यांनी या रस्त्याला ‘टॅलेंट स्ट्रीट’ बनवलं आहे. या टॅलेंट स्ट्रीटवर नवीन कलेला वाव मिळावा यासाठी नितीन देसाई त्याकडे एक ‘प्लॅटफॉर्म’ किंवा एक ‘संधी’ म्हणून पाहतात. ‘तुम्ही नवीन कला सादर करा, त्याची कदर आम्ही करू’ अशा शब्दांत नितीन देसाईंनी नवीन कलाकारांना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे.

‘जी लो अपनी फिल्मी ख्वाहिशे’ ही टॅगलाइन घेतलेल्या ‘एनडीज फिल्म वर्ल्ड’ने पर्यटकांना ‘बॉलीवूड टुरिझम’ हे नवीन स्वप्न दाखवलं आहे आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी नितीन देसाई, त्यांची टीम आणि एमटीडीसीचे अधिकारी यांनी आपला जीव त्यात ओतला आहे. त्यांच्या या मेहनतीला ‘नेटफ्लिक्स’नेही ‘ए’ ग्रेड देऊन सलाम केला आहे. हायड्रॉलिक स्टेजपासून ते डोळे दिपवून टाकणाऱ्या लाईट्सपर्यंत सर्व बाबतीत परिपूर्ण आणि सुसज्ज रंगमंच उभारून नितीन देसाई यांनी ‘टॅलेंट तुम्हारा, प्लॅटफॉर्म हमारा’ अशी हाक तरुण आणि नवीन कलाकारांना दिली आहे. ‘एक दिवसाचा अकबर’ किंवा ‘एक दिवसाची अनारकली’ बनण्याचं स्वप्न पूर्ण करायलाही नितीन देसाईंनी इथे उभारलेला ‘टाइम स्क्वेअर’ सज्ज आहे. आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या चंदेरी दुनियेची सफर घडवण्यासाठी ‘एनडीज फिल्म वर्ल्ड’ची जादुई गुहा रसिकांसाठी खुली झाली आहे.