‘कोर्ट’ चित्रपटाची ऑस्करसाठीची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्याने मराठी चित्रपटसृष्टी व समाज यामध्ये ‘चैतन्य’ पसरले असले तरी २०१५ च्या पहिल्या नऊ महिन्यात प्रदर्शित झालेल्या ६६ मराठी चित्रपटांपैकी तब्बल ४३ मराठी चित्रपटांनी मोजून फक्त एकाच आठवड्यात चित्रपटगृहातून गाशा गुंडाळला. ही दुर्देवी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मराठी चित्रपटाची ऑस्करवारीसाठीची झेप महत्त्वाची की प्रेक्षकांचा प्रतिसाद असा महत्त्वाचा प्रश्न विचारात घेणे गरजेचे आहे.
जानेवारीत झळकलेल्या ‘लोकमान्य’, ‘क्लासमेट’ व ‘बाळकडू’ या चित्रपटांच्या यशाने चांगली सुरूवात झाली पण ‘एक तारा’, ‘बाजी’, ‘रझाकार’ या चित्रपटांनी निराशा केल्याने काही काळ प्रेक्षक दुरावला. त्यानंतर ‘कांकण’, ‘टाईमपास-२’, ‘अगं बाई अरेच्चा-२’, ‘संदुक’, ‘कोर्ट’, ‘किल्ला’, ‘शटर’, ‘देऊळबंद’, ‘डबल सीट’ व ‘तू ही रे’ या चित्रपटांनी कमी-अधिक प्रमाणात यश मिळवले. तरी भरघोस आणि तडाखेबाज म्हणावे असे यश एकाही चित्रपटास मिळालेले जाणवले नाही. तर, ‘कॉफी आणि बरचं काही’ , ‘युद्ध’, ‘वेलकम जिंदगी’, ‘नागरिक’, ‘ढोलकी’, ‘हायवे- एक आरपार सेल्फी’, ‘निळकंठ मास्तर’, ‘ढिनचॅक एन्टरप्रायझेस’, ‘मर्डर मेस्त्री’ अशा कितीतरी चित्रपटांना एकाच आठवड्यात चित्रपटगृहातून उतरावे लागले. ‘कॅरी ऑन मराठा’, ‘अ पेईंग घोस्ट’ यांना सर्वसाधारण स्वरूपाचे यश लाभले. अन्य बरेच चित्रपट प्रदर्शित झाल्याची नोंद झाली. त्यात ‘घुसमट’, ‘जाणीवा’, ‘स्लॅमबुक’ इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे. एकाच शुक्रवारी तीन-चार मराठी चित्रपटाचे प्रदर्शन, एकसुरी व दिशाहीन पूर्वप्रसिद्धी, चित्रपटांनी केलेली निराशा ही अपयशाची ठळक कारणे ठरली. काही चित्रपटांचे प्रेक्षकांअभावी खेळ रद्द करावे लागले.