शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटाचा नुकताच टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. तमाम हिंदू बांधवांच्या मनावर राज्य करणाऱ्या बाळासाहेबांसारख्या प्रभावी नेत्याची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारणार कोण? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. यासाठी अनेकांची नावं चर्चेत होती. अगदी टिझर प्रदर्शित होण्यापूर्वी काही तास अगोदर अभिनेता अजय देवगण याचंही नाव चर्चेत होतं. अखेर ही भूमिका साकारण्याची संधी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याला मिळाली.

‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘बाबुमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटांमधील दर्जेदार अभिनयामुळे नवाजुद्दीनच्या अभिनयाबाबत तिळमात्र शंका नव्हती. पण, बाळासाहेबांच्या भूमिकेत नवाजुद्दीनं शोभून दिसेल का? तो मराठी कसं बोलेल? अशा एक न अनेक शंका लोकांच्या मनात होत्या. पण मी चांगलं मराठी बोलेन आणि मराठी बोलण्याची प्रेरणा मला बाळासाहेब ठाकरेच देतील, असं म्हणत नवाजुद्दीननं लोकांच्या मनातील सगळ्या शंकांचे मळभ तात्पुरते दूर केले आहे. टिझर लाँचिंगच्या सोहळ्याला नवाजुद्दीन प्रत्यक्षात उपस्थित राहू शकला नाही. पण व्हिडिओद्वारे त्यानं आपलं मनोगत व्यक्त केलं.

‘ बाळासाहेबांची भूमिका साकारावी असं जगातल्या कोणत्याही अभिनेत्याला वाटेल. साहजिकच या मोठ्या नेत्याची भूमिका साकारायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. माझं कास्टिंग झाल्यानंतर सगळ्यांनाच हा प्रश्न पडला होता की, मी मराठी कसं बोलेल? पण, मी सगळ्यांना खात्रीनं सांगतो की बाळासाहेब ठाकरेच मला मराठी बोलण्याची प्रेरणा देतील, आशीर्वाद देतील आणि त्यांची लाडकी भाषा मराठी माझ्यावर तेवढंच प्रेम करेल.’ अशी भावना नवाजुद्दीननं यावेळी व्यक्त केली. विशेष म्हणजे त्याच्या मराठीबद्दल उपस्थित केलेल्या शंकेचं निरसन त्यानं मराठी भाषेतच केलं. त्यामुळे नवाजुद्दीनच्या या प्रयत्नाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.