सोशल मीडियावर बऱ्याच वेळा अनेक कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो त्याच बरोबर कधीकधी त्यांना अनेक धमक्याही येत असल्याचे समोर येते. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री पूजा भट्ट सोबत घडला आहे. या संदर्भात पूजाने ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पूजाला इन्स्टाग्रामवर अनेक धमक्या येत आहेत. तिने या संदर्भात इन्स्टाग्रामकडे तक्रारही केली पण त्यांनी दिलेले उत्तर पाहून पूजा संतापली आहे. ‘मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तू मर हे मेसेज येणे इन्स्टाग्रामसाठी नॉर्मल गोष्ट आहे. कारण जेव्हा मी इन्स्टाग्रामकडे याबाबत तक्रार केली त्यावर त्यांनी या मेसेजनी त्यांच्या गाइडलाइन्सचे उंल्लघन केलेले नाही असे म्हणत त्या यूजर्सला ब्लॉक करण्याचा सल्ला दिला. या पेक्षा ट्विटरचे स्टँडर्स आणि गाइलाइन्स खूप चांगल्या आहेत’ या आशयाचे ट्विट केले आहे.

त्यानंतर पूजाने आणखी एक ट्विट केले आहे. ‘त्यापेक्षा ही वाईट गोष्ट म्हणजे एका महिलेकडून किंवा महिला असल्याचे भासवणाऱ्या अकाऊंवरुन जा मर किंवा तू स्वत: मरत का नाहीसचे आलेले मसेज. इन्स्टाग्राम तुम्ही तुमच्या गाइडलाइनवर काम करायला हवे. सायबर बुलिंग एक गुन्हा आहे या आशयाचे ट्विट तिने केले आहे.

केवळ पूजा भट्टच नाही तर इतर अनेक कलाकारांनी इन्स्टाग्रामच्या गाइडलाइन्सच्या विरोधात मत मांडले होते. सोनम कपूरची बहिण रिया कपूरला देखील इन्स्टाग्रामवर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. तिने देखील यासंदर्भात इन्स्टाग्रामकडे तक्रार केली होती. त्यावेळी त्यांनी हे त्यांच्या गाइडलाइन्सच्या विरोधात नसल्याचे म्हटले होते.