देशातल्या पाच राज्यातल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. अंतिम विजय कोणाचा हे अवघ्या काही तासांमध्ये कळेलच. दरम्यान, या निकालांसंदर्भात अनेकजण ट्विट करत याबद्दल आपले विचार व्यक्त करत आहेत. अभिनेत्री कंगना रणौतनंतर आता अभिनेते प्रकाश राज यांनीही या निवडणुकीवरचं आपलं मत व्यक्त केलं आहे.
आपल्या ट्विटमध्ये प्रकाश राज म्हणतात, “डन अँड डस्टेड! प्रिय सर्वोच्च नेत्यांनो, नागरिकांनी स्पष्टपणे म्हटले आहे. द्वेष आणि व्हायरस पसरवणं आता थांबवा. चांगली दाढी करा आणि तुम्ही जे केलंय ते पूर्ववत करायला आता सुरुवात करा. जीव महत्त्वाचा आहे”.
#KhelaHobe done n dusted ..Dear supreme leader.. citizens have called the bluff .. enough of spreading HATRED and VIRUS.. have a good shave n start undoing what you have done. LIVES MATTER #justasking pic.twitter.com/C22JivuYRn
— Prakash Raj (@prakashraaj) May 2, 2021
पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्ये तसेच पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सर्वाधिक चुरस पश्चिम बंगालमध्ये आहे. ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस सत्ता राखणार की भाजपला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.
सुरुवातीचे कल हाती आले असून यानुसार राज्यात तृणमूल काँग्रेसची लाट कायम असून पुन्हा ममता बॅनर्जी विजयाची हॅटट्रिक करण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. तर भाजपाची मात्र १०० च्या पुढेही जाताना दमछाक होण्याची शक्यता आहे. देशभरात एकीकडे करोनाचं मोठं संकट सुरू असताना राजकीय वर्तुळात आज या निकालांची चर्चा आहे.