सध्या बॉलीवूडमध्ये चरित्रपटांचे वारे वाहत आहेत. ‘भाग मिल्खा भाग’, ‘दंगल’, ‘मेरी कोम’ आणि त्यानंतर आता लवकरच संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटही येणार आहे. या चित्रपटात बॉलीवूडचा हॅण्डसम हंक रणबीर कपूर हा संजूबाबाची मुख्य भूमिका साकारणार असल्याचे तर सर्वांनाच माहित आहे. पण, त्याव्यतिरीक्त आणखी एका चरित्रपटामध्ये रणबीर दिसण्याची शक्यता आहे.

बॉलीवूड दिग्दर्शक शूजीत सिरकार हा ‘पिंक’ चित्रपटानंतर बराच चर्चेत आला आहे. लैगिक अत्याचार यासारखा महत्त्वाचा विषय हाताळल्यानंतर तो आता आणखी एका चांगल्या विषयावर चित्रपट बनविण्याच्या तयारीत आहे. त्याचा पुढचा चित्रपट हा उधम सिंग यांच्या आयुष्यावर असणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. उधम सिंग हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे नाव आहे. स्वातंत्र्य सैनिक असलेल्या उधम यांनी त्यावेळी मायकल अॅडवायरची हत्या केली होती. १९१९ साली जालियनवाला बाग येथे भरलेल्या शांतता सभेत गोळीबार करण्याचे आदेश त्यावेळी मायकर अॅडवायरने दिले होते. भारतीय इतिहासातील ही एक वाईट घटना होती. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत शूजीत सिरकारने उधम सिंगच्या कार्याला लोक विसरले असल्याचे म्हटले. शूजीत म्हणाला की, स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख व्यक्तिंपैकी उधम हे एक होते. पण, आजच्या तरुणाईत फार कमी जणांना या हुतात्म्याविषयी माहित आहे. या नायकाला लोक विसरले आहेत. आजच्या तरुणाईला माझ्या चित्रपटातून त्यांच्याबद्दल मला सांगायचे आहे.

हुतात्मा उधम सिंगची भूमिका साकारण्यासाठी शूजीतने एका योग्य कलाकाराची निवड केल्याचे कळते. स्पॉटबॉय ई संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, या हुतात्माच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसण्याची शक्यता आहे. गेल्या काही चित्रपटांमध्ये (ऐ दिल है मुश्किल, तमाशा) रणबीरने रोमॅण्टिक भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे आता रणबीरसाठी ही एक वेगळीच आणि महत्त्वाची भूमिका ठरेल.

उधम सिंग यांचा जन्म २६ डिसेंबर १८९९ रोजी झाला होता. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी ते अनाथ झाले होते. त्यामुळे त्यांचे पालनपोषण अमृतसर येथील खालसा अनाथालयामध्ये झाले होते. जालियनवाला बाग येथे झालेल्या हत्याकांडावेळी ते तेथे उपस्थित होते. सुदैवाने तेव्हा त्यांची सहीसलामत सुटका झाली होती. पण, त्यावेळी बदल्याची आग त्यांच्या हृदयात होती. १३ मार्च १९४० रोजी उधम सिंग यांनी  मायकल अॅडवायरची गोळी घालून हत्या केली होती.