भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित नुकतचा एक चित्रपट येऊन गेला. या चित्रपटाचे नाव ‘पी. एम. नरेंद्र मोदी’ असे होते. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय याने नरेंद्र मोदींची भूमिका साकारली होती. या चित्रपटावरुन प्रेरणा घेऊन अभिनेता रवि किशन देखील नरेंद्र मोदींवर चित्रपट तयार करणार आहे. भोजपूरी अभिनेता रवि किशन स्वत: या चित्रपटात मोदींची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट भोजपूरी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये तयार केला जाणार आहे.

रवि किशन भोजपूरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने याआधी हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम अशा विविध भाषांतील चित्रपटांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाचे प्रदर्शन केले आहे. परिणामी अष्टपैलु अभिनेता म्हणून त्याचे कौतुक केले जाते.

रविने पाटना बीजेपी कार्यालयात झालेल्या एका पत्रकार परिषदेत आपल्या आगामी प्रकल्पांची घोषणा केली. त्याला नरेंद्र मोदी व स्वामी विवेकानंद या दोन व्यक्तिमत्वांवर आधारित चित्रपट तयार करायचे आहेत. “नरेंद्र मोदी व स्वामी विवेकानंद ही दोन व्यक्तिमत्व माझे प्रेरणा स्त्रोत आहे. या दोघांचा उत्साह व महत्वकांक्षा पाहून मला नेहमीच आश्चर्यचकित व्हायला होते. मोदी आगामी पीढीसाठी आदर्श आहेत. त्यांचे विचार, तत्व आणि काम करण्याची पद्धत हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. त्यांचे अनन्यसाधारण कर्तुत्व सर्वांना कळावे यासाठी मी नरेंद्र मोदी व स्वामी विवेकानंद जीवनावर आधारित चित्रपट तयार करणार आहे” असे रवि किशन याने सांगितले.

नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित याआधी तयार केल्या गेलेल्या चित्रपटावर प्रचंड टीका करण्यात आली होती. तसेच तो चित्रपट बॉक्स ऑफीसवर काही खास कमाल करु शकला नव्हता, या पार्श्वभूमिवर विचार करता रवि किशनचा चित्रपट काय कमाल करतो, हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल असे म्हटले जात आहे.