भा. रा. भागवत यांच्या लेखणीतील ‘फास्टर फेणे’ २७ ऑक्टोबरपासून आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. जेनेलिया व रितेश देशमुखच्या ‘मुंबई फिल्म कंपनी’ आणि ‘झी स्टुडिओज’ यांची निर्मिती असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील प्रमोशनल गाण्याचे अनावरण नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाला फास्टर फेणे अर्थात अमेय वाघ, गिरीश कुलकर्णी, पर्ण पेठे, सिद्धार्थ जाधव, चिन्मयी सुमीत, बालकलाकार शुभम मोरे, लेखक क्षितिज पटवर्धन, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, संगीतकार अर्को यांची उपस्थिती होते.

रितेश देशमुखनेच या प्रमोशनल गाण्याची संकल्पना मांडली. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अर्को मुखर्जी यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले असून गीतकार प्रशांत इंगोले यांनी आपले शब्द या गाण्याला दिले आहेत. अर्को यांनी ‘कपूर अँड सन्स’, ‘बरेली की बर्फी’, ‘रुस्तम’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांतील गाण्यांना संगीत दिले आहे. त्यांच्या या मराठीतल्या त्यांच्या पहिल्याच प्रयत्नाला भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आशा त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सीझर गोन्साल्विस यांनी खास शैलीत नृत्यदिग्दर्शन केले आहे.

वाचा : रोहित शेट्टीला का वाटतेय आमिरची भिती?

या कार्यक्रमात रितेश देशमुख म्हणाला की, ‘फास्टर फेणे हा माझ्या हृदयाजवळचा चित्रपट आहे. हे मी माझं भाग्य समजतो कि मला फास्टर फेणे मोठया पडद्यावर घेऊन येण्याची संधी मिळाली. हे गाणे फास्टर फेणे या पात्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाकडून आहे. या चित्रपटाचा जॉनर लक्षात घेता यात गाणं बसवणं कठीण होतं परंतु मला प्रमोशनल गाणं करण्याची आणि ते गाण्याची संधी मिळाली याचं खरंच समाधान आहे.’