करोनामुळे लॉकडाउनचा कालावधी वाढल्यामुळे हातावर पोट असणारे अनेक मजुरांनी त्यांच्या गावाकडची वाट धरली आहे. प्रत्येक जण मिळेल ते वाहन पकडून किंवा पायी चालत जाऊन गाव गाठत आहे. मात्र काळात मजुरांना अनेक संकटं, हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. काही दिवसांपूर्वी एका मृत मजूर महिलेच्या दोन चिमुकल्यांचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आपल्या आईचा मृत्यू झाल्याची कल्पनाही नसलेले ही दोन चिमुकली मुलं आईला उठविण्याचा प्रयत्न करत होते. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला होता. हा व्हिडीओ अभिनेता शाहरुख खानने पाहिल्यानंतर तो या मुलांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. त्याच्या मीर फाउंडेशनने या मुलांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मीर फाऊंडेशनने या संदर्भात एक ट्विट करत या चिमुकल्यांना मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे आम्ही या मुलांची जबाबदारी घेतोय, असं त्यांनी म्हटलं आहे.

“व्हिडीओमध्ये आईला उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चिमुकल्यांपर्यंत पोहोचविलं त्यासाठी आभार. आम्ही या मुलांची जबाबदारी घेत आहोत. सध्या ही दोन्ही मुलं त्यांच्या आजी-आजोबांसोबत सुरक्षित आहे”, असं ट्विट मीर फाउंडेशनने केलं आहे.

काही दिवसांपूर्वी बिहारच्या मुजफ्फरपूरमधील रेल्वेप्लॅटफॉर्मवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. अहमदाबादमधून मजुरांसाठी सोडण्यात आलेल्या स्पेशन ट्रेनने अरविना खातून(३५ वर्ष) ही महिला आपल्या दोन मुलांसह प्रवास करत होती. मात्र २५ मे रोजी मुजफ्फरपूर रेल्वे स्थानकात या महिलेचा दुर्दैवी अंत झाला. या वेळी तिला ब्लॅंकेटने झाकलं होतं. परंतु आपल्या आईचा मृत्यू झाल्याची जराही कल्पना नसलेली तिची दोन्ही मुलं तिच्यावर ओढलेल्या ब्लॅंकेटसोबत खेळत होते. तिला सतत उठविण्याचा प्रयत्न करत होते. हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर शाहरुख खान आणि त्याची मीर फाऊंडेशन या चिमुकल्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. शाहरुखने या मुलांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, लॉकडाउनमुळे ओढावलेल्या या संकटकाळात शाहरुख खान त्याला शक्य होईल त्याप्रमाणे गरजुंची मदत करत आहे. त्याने कोलकाता नाइट राइडर्स, रेड चिलीज एंटरटेनमेंट, मीर फाउंडेशन आणि रेड चिलीज वीएफएक्स या कंपनीअंतर्गंत अनेकांना मदत केली आहे. तसंच पंतप्रधान मदतनिधीमध्ये आर्थिक रक्कम जमा केली आहे. तसंच २५ हजार पीपीई किटही दिल्या आहेत.