बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला आयआयपीएम (इंडियन इंस्टीट्यूट ऑफ प्लानिंग अँड मॅनेजमेंट) संस्थेबरोबर असलेल्या व्यवहाराबाबत खुलासा करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आहे.

आयआयपीएम ही एक शैक्षणिक संस्था आहे. विद्यार्थांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआय या संस्थेची चौकशी करत आहे. या संस्थेची जाहिरात बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने केली होती. शाहरुख खानवर विश्वास ठेऊन या संस्थेत प्रवेश घेतला होता, असा दावा विद्यार्थ्यांनी तक्रारीत केला होता. त्यामुळे शाहरूख खानची देखील चौकशी केली जावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती. परिणामी कोलकाता उच्च न्यायालयाने शाहरुख खानला आयआयपीएमबरोबर असलेल्या व्यवहाराबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

दरम्यान, याचिका करणाऱ्यांचे सर्व आरोप शाहरुखच्या वकिलांनी मात्र फेटाळून लावले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने या संस्थेशी संबंध नसल्याचे अगोदरच स्पष्ट केलेले आहे. तसेच दिल्ली उच्च न्यायालयानेही आयआयपीएम ही संस्था बोगस असल्याचे घोषित केले होते. त्यामुळे शाहरुख खानने या संस्थेबरोबर केलेला करार तात्काळ रद्द केला. आता त्यांचा या संस्थेशी काहीही संबंध नाही. शाहरुखने केवळ आयआयपीएमच्या दोन जाहिराती केल्या होत्या. त्या व्यतिरिक्त त्याचा या संस्थेशी काहीही संबंध नाही. असा दावा शाहरुख खानच्या वकिलांनी केला आहे.