07 March 2021

News Flash

मासिक पाळीमुळे तनुश्री चिडली असावी; ‘हॉर्न ओके प्लीज’च्या निर्मात्यांचे लाज आणणारे वक्तव्य

या स्टिंग ऑपरेशनदरम्यान निर्माते सामी सिद्दीकी यांच्यासोबतच दिग्दर्शक राकेश सारंगनेही मुक्ताफळे उधळली.

तनुश्री दत्ता

तनुश्री दत्ता- नाना पाटेकर वादात अनेक मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी तनुश्रीची पाठराखण केली आहे. तर प्रसिद्धीसाठी तनुश्री हे सर्व आरोप करत असल्याची टीका काहींनी केली. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीनं केला. या घटनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले. मासिक पाळीमुळे तनुश्रीने शूटिंगदरम्यान चिडचिड केली असावी अशी लाजीरवाणी प्रतिक्रिया चित्रपटाचे निर्माते सामी सिद्दीकी यांनी स्टिंग ऑपरेशनदरम्यान दिली.

शूटिंगदरम्यान नेमकं काय घडलं असा प्रश्न विचारला असता सिद्दीकी म्हणाले, ‘मी तुम्हाला सत्य सांगावं का? मला असं वाटतं की त्यावेळी मासिक पाळीमुळे तनुश्रीची चिडचिड झाली असावी. म्हणूनच जराशा स्पर्शानेही तिने इतका मोठा वाद निर्माण केला. नेमकं काय घडलं हे मलासुद्धा माहित नाही कारण मी घटनास्थळी उपस्थित नव्हतो.’ सिद्दीकी यांच्या या बेताल वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ म्हणजेच ‘सिंटा’चे माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनीही पुराव्याचा मुद्दा उपस्थित करत हात वर केले. ‘सिंटा काय करू शकणार? पोलिसांसारखी भूमिका ते घेऊ शकत नाहीत. नाना पाटेकरांना हजर राहण्यास सांगून त्यांना जाब विचारू शकत नाही. नाना दोषी आहेत हे कसं सिद्ध करणार?,’ असं चौहान म्हणाले. सेटवर उपस्थित असलेल्यांपैकी एखाद्याला प्रत्यक्षदर्शी म्हणून समोर आणता येऊ शकतं असं जेव्हा पत्रकाराने म्हटलं तेव्हा पुढे ते म्हणाले, ‘मग त्यांना कोर्टात येऊन बोलायला सांगा. जेव्हा कोर्ट किंवा पोलिसांची गोष्ट येते, तेव्हा कोणीच पुढे येत नाही. फक्त आरोप करून काहीच होत नाही, तिने आधी आरोप सिद्ध करावेत.’

वाचा : तनुश्री- नाना वादावर रणवीर- दीपिका म्हणतात..

या स्टिंग ऑपरेशनदरम्यान निर्माते सामी सिद्दीकी यांच्यासोबतच दिग्दर्शक राकेश सारंगनेही मुक्ताफळे उधळली, ‘आता तर मुली इंटरनेटवर बेडरुम सेक्सचे व्हिडिओ अपलोड करतात. प्रसिद्धीसाठी विवस्त्रही होतात. आपलं नाव खराब होत असलं तरी काय फरक पडतोय. किमान प्रसिद्धीच्या झोतात तरी येत आहोत अशी त्यांची मानसिकता असते. तनुश्री फक्त आरोपच करत बसली आहे. ती सरळ पोलिसांकडे का जात नाही,’ असा प्रश्न सारंगने उपस्थित केला. तर दुसरीकडे ‘सिंटा’चे सदस्य आणि ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी नाना पाटेकरांना पाठिंबा देत तनुश्री पराचा कावळा करत असल्याची टीका केली.

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपाने अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले आहे. दिवसागणिक या वादाला एक वेगळंच वळण मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 3:33 pm

Web Title: she must have been on her periods said producer samee siddiqui on tanushree dutta
Next Stories
1 Mi Shivaji Park Trailer : ‘अन्याय होत असताना नुसतं बघत बसणं हा सुद्धा गुन्हाच’
2 या कारणामुळे ‘सेक्रेड गेम्स’ची निर्मिती करणारी ‘फँटम फिल्म्स’ कंपनी झाली बंद
3 Video: रणवीर- दीपिकाचा ‘खलीबली’ डान्स पाहिलात का?
Just Now!
X