गेल्या वर्षभरात दीपिका- रणवीर, प्रियांका -निक जोनास, सोनम आनंद आहुजा ही जोडपी विवाहबंधनात अडकली. यावर्षी कोणते कलाकार विवाहबंधनात अडकणार याची उत्सुता सर्वांनाच आहेच. यंदा फरहान अख्तर- शिबानी दांडेकर, रणबीर कपूर-आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर-मलायका अरोरा विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. अशातच अभिनेत्री श्रद्धा कपूरहीही लग्न करणार अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

अभिनेत्री श्रद्धा कपूर कथित बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठासह लग्न बंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. रोहन श्रेष्ठा हा एक बॉलिवूड फोटोग्राफर आहे. श्रद्धा आणि रोहन गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. तसेच २०१८पासून त्यांनी एकमेकांना डेट करण्यासही सुरूवात केली. श्रद्धाचे कुटुंबीय श्रद्धा आणि रोहनच्या नात्याबाबत फार आनंदी आहेत.

सध्या श्रद्धा ‘छिछोरे’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. तसेच अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या व्यतिरिक्त दक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटात देखील ती झळकणार आहे. रेमो डिसूजाच्या ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटातही श्रद्धा काम करणार आहे. तिच्या सोबत वरूण धवन देखील मुख्य भुमिकेत दिसणार आहे.