करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला. शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं, अनेकांना रोजगार मिळवून दिला. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे. दरम्यान लोकांची मदत करताना आलेले विविध अनुभव सोनू एका पुस्तकाच्या रुपाने देशवासीयांना सांगणार आहे.

अवश्य पाहा – याला म्हणतात खरा सुपरस्टार; चित्रपटातून केलं बाहेर पण एका सीनसाठी घेतले ७४ कोटी

सोनू सूदचं एक नवं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे. आय एम नॉट मसिहा (मी तारणहार नाही) असं या पुस्तकाचं नाव आहे. येत्या डिसेंबर महिन्यात हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. करोना काळात लोकांची मदत करताना आलेले अनुभव तो या पुस्तकातून सांगणार आहे. हे पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीला प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास सोनूने व्यक्त केला आहे. या पुस्तकाचं कव्हर पेज त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केला ‘बाथरुम सेल्फी’; काही तासांत मिळाले ६ लाख व्हूज

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने १५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.