अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी (१४ जून) मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कूपर रुग्णालयाने सोमवारी शवविच्छेदनाचा अहवाल जाहीर केला आहे. गळफास घेतल्यामुळे श्वास कोंडून सुशांतचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे. रासायनिक चाचणीसाठी त्याच्या आतडयांचे नमुने सुरक्षित ठेवण्यात येतील व न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठवण्यात येतील.

रविवारी रात्री सुशांतचे कुटुंबीय बिहारहून मुंबईला आले. सोमवारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सुशांतच्या घरातून कोणतीच सुसाइड नोट न मिळाल्याने त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्याच्या घरी काम करणाऱ्यांची, शेजाऱ्यांची, मित्रांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

आणखी वाचा : एवढं सारं मिळवल्यावर आत्महत्या करण्याचा विचार मनात येतो कुठून?; बिग बी झाले भावूक

‘किस देश मै है मेरा दिल’ या मालिकेतून सुशांतने करिअरची सुरुवात केली. मात्र ‘पवित्र रिश्ता’मुळे तो घराघरांत पोहोचला होता. २०१३ मध्ये सुशांतने ‘काई पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘पीके’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्राइव्ह’ या चित्रपटात तो शेवटचा झळकला होता.