आपल्या सहज अभिनय शैलीने सिनेरसिकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. आज त्यांची जयंती. सशक्त व उत्तम अभिनयाच्या जोरावर स्मिता पाटील यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. श्वास असल्याप्रमाणे त्यांचं अभिनयावर प्रेम होतं. त्यामुळे त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला आहे. विशेष म्हणजे अभिनयासोबतच त्यांची आणि राज बब्बर यांची लव्हस्टोरीदेखील त्याकाळी चांगलीच चर्चेत राहिली होती.

स्मिता पाटील या खासकरुन गंभीर भूमिकांसाठी ओळखल्या जात होत्या. मात्र, खऱ्या आयुष्यात त्यांचा स्वभाव फार वेगळा होता. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आणि सतत हसरा चेहरा हा त्यांचा खरा स्वभाव होता. अनेक चित्रपटांमधील भूमिका गाजवणाऱ्या स्मिता पाटील यांचे असंख्य चाहते होते. मात्र, स्मिता पाटील या अभिनेता राज बब्बर यांच्या प्रेमात होत्या.

‘आज की आवाज’ या चित्रपटाच्या निमित्ताने स्मिता आणि राज बब्बर यांची भेट झाली. हा चित्रपट आणि यात दोन्ही कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांची विशेष चर्चा रंगली. सोबतच त्यांच्या अफेअरचीदेखील चर्चा रंगू लागली. हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. परंतु, राज बब्बर यांचं पहिलं लग्न झालं होतं. तसंच त्यांना दोन मुलंदेखील होती. त्यामुळे स्मिता यांच्या आईने लग्नाला नकार दिला होता. विशेष म्हणजे स्मिता यांनी कोणाचाही विचार न करता राज यांच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता, असं म्हटलं जातं. ८०च्या दशकात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणे ही खूप मोठी गोष्ट होती.

दरम्यान, स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५६ रोजी पुण्यामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शिवाजीराव पाटील आणि आई विद्या ताई पाटील. त्यांचे शिक्षण एका मराठी शाळेत झाले. एकदा स्मिता यांची ओळख चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्याशी झाली. श्याम बेनेगल यांनी त्यांचा चित्रपट ‘चरणदास चोर’मध्ये त्यांना छोटी भूमिका दिली. त्यानंतर स्मिता यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या होत्या.