05 July 2020

News Flash

‘दोन स्पेशल’ अप्रतिम! शब्दातीत!!

आपल्याकडे पत्रकारितेवरचं नाटक वा चित्रपट हे बहुतांशी अतिशयोक्त आणि अतार्किक असतात असाच आजवरचा अनुभव.

| July 5, 2015 01:08 am

आपल्याकडे पत्रकारितेवरचं नाटक वा चित्रपट हे बहुतांशी अतिशयोक्त आणि अतार्किक असतात असाच आजवरचा अनुभव. याचं कारण ते बनवणारे एकतर पत्रकारितेचा अनुभव गाठीशी नसलेले असतात आणि त्यांना त्याकरता अभ्यासाची गरजही वाटत नाही. आज प्रसार माध्यमांचा प्रचंड विस्फोट होत असताना असताना वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचं अक्राळविक्राळ रूप अनेकांच्या मनात धडकी भरवतं. ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ ही आपली भूमिका त्यांनी सोडलेय की काय असं वाटावं अशीच स्थिती आहे. एकीकडे पत्रकारितेचा कणा असणारा नि:पक्षपातीपणा आणि आदर्श मूल्यं लोप पावत असताना दुसरीकडे पैसा, सत्ता, प्रसिद्धी- आणि झालंच तर आपल्या (किंवा मालकाच्या) कुकृत्यांवर पांघरूण घालण्याचं साधन म्हणून ते वापरलं जाऊ लागलं आहे. पत्रकारिता हा आज निरपेक्ष समाजप्रबोधनाचा पेशा राहिला नसून धंदा होत चाललाय. ‘हा काळाचा परिणाम आहे. काळाबरोबर बदलावंच लागतं,’ असं म्हणत याचं समर्थन करण्याची अहमहमिका लागलेली दिसते. पत्रकारितेत विद्वान, समाजहितैषी संपादकांचं महत्त्व कमी होऊन केवळ धंदा करू इच्छिणाऱ्या व्यवस्थापनाच्या हातात सूत्रं गेली आहेत. याची परिणती म्हणजे ‘पेड न्यूज’चा बोकाळलेला रोग. कुठल्या बातमीमागे कोण आहे, ती पेरण्यामागे त्या व्यक्तीचा काय हेतू आहे, याचा वास सर्वसामान्य वाचकालाही आता सहज येऊ लागला आहे. म्हणूनच हल्ली वाचक वर्तमानपत्र वाचत असले तरी त्यावर पूर्वीसारखं डोळे झाकून विश्वास ठेवत नाहीत. कारण वृत्तपत्रांनी स्वत:च हा विश्वास गमावला आहे. या पाश्र्वभूमीवर ८० च्या दशकाअखेरच्या पत्रकारितेवर आधारित क्षितीज पटवर्धन लिखित-दिग्दर्शित ‘दोन स्पेशल’ हे नाटक सद्य:पत्रकारितेची नि:संदिग्ध चाहुल दर्शवणारं आहे यात शंकाच नाही. मराठी रंगभूमीवर आशय, विषय, अभिव्यक्ती, सादरीकरण अशा सर्वचदृष्टय़ा इतकं अप्रतिम, अविस्मरणीय नाटक गेल्या कित्येक वर्षांत आलेलं नाही. आणि नजीकच्या काळातही येईल की नाही, सांगता येत नाही. याचं कारण आपण सर्वचजण आज संवेदना हरवून बसलो आहोत, हे आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टीचं काही वाटेनासं झालेलं आहे. अपघातात सापडलेल्या व्यक्तींना मदत करायची सोडून त्याचं चित्रीकरण करून ते लगेचच सोशल मीडियावर टाकणारे आपण- स्वत:ला ‘माणूस’ म्हणवून घ्यायच्या तरी लायकीचे उरलो आहोत का, हाच खरा प्रश्न आहे. मग या भयावह असंवेदनशीलतेचं प्रतिबिंब वृत्तपत्रादी माध्यमांतून उमटलं तर दोष कुणाला द्यायचा? ..तर ते असो.
‘दोन स्पेशल’ हे नाटक ह. मो. मराठे यांच्या ‘न्यूज स्टोरी’ या कथेवर आधारित आहे. परंतु त्याचं नाटय़रूप करताना नाटककारानं आपल्याला जो टोकदार आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे त्याकरता त्यात काही बदल केले आहेत आणि ते यथोचित आहेत.
हे नाटक घडतं पुण्यातल्या ‘हिंदुस्थान’ नावाच्या एका वजनदार वृत्तपत्राच्या कचेरीत. साल १९८९. वेळ : रात्री ९.३० ची. मिलिंद भागवत हा रात्रपाळीतला प्रमुख उपसंपादक नुकताच घाईघाईत कचेरीत पोहोचलाय. त्याचे आजारी वडील हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने तो काहीसा विवंचनेत आहे. कचेरीत पोचतो- न पोचतो तोच त्याच्या पत्नीचा फोन येतो.. ‘उद्या डॉक्टरांनी नऊ हजार रुपये भरायला सांगितलेत.’ आधीच परिस्थितीनं कावलेला मिलिंद कसंबसं स्वत:ला सावरत तिची समजूत काढतो (खरं तर स्वत:चीच!) आणि पैशांची काहीतरी व्यवस्था करू, म्हणत फोन ठेवतो. तोवर बहुधा वृत्तपत्राची पहिली आवृत्ती गेलेली आहे. त्याच्यावर दुसऱ्या आवृत्तीची जबाबदारी आहे. तो दिवसभरातल्या बातम्यांचा आढावा घेतो. त्या दिवशी पुण्यात सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीची भिंत कोसळून एका बालकाचा मृत्यू आणि अन्य काही जखमी झालेले असतात. तीनच वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीच्या बांधकामाचा काही भाग कोसळावा याचा अर्थ बांधकामात हलगर्जीपणा आणि गैरव्यवहार झालेला आहे, हे उघडच आहे. या बातमीसोबत त्यांच्या छायाचित्रकारानं काढलेलं माणुसकीचा गहिवर टिपणारं एक छायाचित्र आहे. ही बातमी पहिल्या पानावर ठळकपणे लावायची असं मिलिंदनं ठरवलंय. तेवढय़ात उमेश भोसले हा एक होतकरू तरुण त्याला भेटायला येतो. त्यालाही मिलिंदसारखं तत्त्वनिष्ठ पत्रकार व्हायचंय. त्यासाठी त्याला त्याचं मार्गदर्शन हवंय. जमलंच तर नोकरीही! ऐन घाईगर्दीच्या वेळी त्याचं येणं मिलिंदला फारसं आवडलेलं नसलं तरी त्याच्या बोलण्यातील सच्चेपणानं तो विरघळतो. त्याला उपदेशाचे चार शब्द सुनवतो. एवढय़ात त्याच्या लक्षात येतं की, या बातमीसाठी काही ठोस पुरावे हाती असायला हवेत. तो त्या इमारतीसाठी बांधकाम साहित्य पुरवणाऱ्या गृहस्थांना फोन लावतो. त्यांच्याकडे इमारतीसाठी पुरवलेल्या मालाची बिलं, चलन असल्याचं त्याला कळतं. तो त्यांच्याकडे त्यांची झेरॉक्स मिळेल का, असं विचारतो. तेही राजी होतात. मिलिंद मग उमेशलाच त्यांच्याकडे ते आणायला पाठवतो. उमेश जातो.

एवढय़ात स्वप्ना घाईघाईत ऑफिसात येते. स्वप्ना ही एकेकाळची मििलदची प्रेयसी. सोबत काही काळ काम करणारी. तिला एवढय़ा रात्री कचेरीत आलेलं पाहून मिलिंदला आश्चर्याचा धक्का बसतो. त्याला रात्रपाळीला पाहून तिलाही. कशासाठी आली असेल ही? ती लगेचच खुलासा करते, ‘इकडूनच चालले होते. म्हटलं, डोकावावं आपल्या जुन्या ऑफिसात.’ त्याला अर्थातच ते खरं वाटत नाही. तरीही तो काही बोलत नाही. तीच मग इकडचा तिकडचा विषय काढत ‘आज काय विशेष बातमी?’ म्हणून विचारते. तो सांस्कृतिक केंद्राच्या बातमीबद्दल सांगतो. ती, ती वाचायला मागते. वाचल्याबरोबर तिचा चेहरा खर्रकन् उतरतो. तो तिला त्याबद्दल विचारतो. ती म्हणते, ‘बातमी योग्यच आहे. पण त्यातल्या शेवटच्या तीन ओळी आवश्यकच आहेत का?’
..आणि त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. ते सांस्कृतिक केंद्र बांधणाऱ्या संकलेचा बिल्डरच्या ऑफिसमध्ये ती नोकरीला असते. आणि बातमीतला संकलेचा बिल्डर्सचा निर्देश तिला खटकलेला असतो. तसा उल्लेख बातमीत येऊ नये म्हणून वृत्तपत्रातील संबंधितांना ‘मॅनेज’ करण्याच्या कामगिरीवर तिला पाठवलं गेलेलं असतं. तो तिला तिथल्या तिथंच उडवून लावतो. त्या निर्देशासहच बातमी प्रसिद्ध होईल, असं निक्षून सांगतो. ती त्याला परोपरीनं पटवायचा प्रयत्न करते, पण तत्त्वनिष्ठ मििलद तिला भीक घालीत नाही.
त्यानंतर सुरू होते एक प्रदीर्घ लढाई.. तत्त्वं की माणसाचं जगणं, यांतली! तशात एकेकाळी जिच्यावर सर्वस्वानं प्रेम केलं अशी व्यक्तीच या लढाईत तुमची शत्रू बनून समोर उभी ठाकली तर लढाई आणखीनच अवघड होते. त्यात भर म्हणून तिच्याही जीवन-मरणाचा प्रश्न त्यात गुंतलेला असेल तर..? तर मग कशाला प्राधान्य द्यायचं? तत्त्वनिष्ठेला की व्यक्तीच्या जीवन-मरणाच्या प्रश्नाला? शेवटी कुणाची सरशी होते या लढाईत? तत्त्वाची की माणुसकीची?
लेखक-दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांनी या दोघांची जीवघेणी कोंडी त्यातल्या अनेक कंगोऱ्यांसह प्रत्ययकारीरीत्या ‘दोन स्पेशल’मध्ये साकारली आहे. व्यक्ती आणि व्यवस्था यांच्यातला संघर्ष एकीकडे, तर दुसरीकडे तत्त्वनिष्ठा आणि माणसाचं प्रत्यक्ष जगणं यांच्यातला संघर्ष.. अशा दोन पातळ्यांवर हे नाटक खेळत राहतं. स्वप्ना आणि मिलिंदचं पूर्वायुष्य, एका आकस्मिक घटनेनं त्यांच्या प्रेमाचा झालेला खेळखंडोबा.. आणि दोघांच्याही ध्यानीमनी नसताना सांस्कृतिक केंद्राच्या त्या बातमीच्या निमित्तानं त्यांचं (नको त्या परिस्थितीत) एकमेकांसमोर अचानक येणं.. परस्परांच्या हितसंबंधांचा पराकोटीचा संघर्ष.. व्यवस्थेनं आणि परिस्थितीनं उभं केलेलं हे आव्हान पेलताना दोघांचीही होणारी प्राणांतिक घुसमट.. असा एक व्यापक पट नाटकात रचलेला आहे. या चक्रव्यूहाचा भेद करताना उभयतांची होणारी तगमग, कोंडी.. परस्परांचा आत्मसन्मान कायम राखत त्यातून तोडगा काढण्याची त्यांची व्यर्थ धडपड.. आणि समोर रस्ताच संपलेला..पुढे फक्त खोल खोल दरी. बळी घ्यायला आ वासलेली. परतीचे दोरही कापलेले. काय करायचं अशावेळी माणसानं? परिस्थितीला शरण जायचं? तत्त्वं गुंडाळून ठेवायची? की मुकाटपणे बळी जायचं? ‘दोन स्पेशल’मधला हा जीवघेणा पेच प्रेक्षकालाही फासाच्या दोरखंडापुढे उभं करतो.
मिलिंदच्या तोंडी भविष्यातील पत्रकारितेचं जे चित्र रंगवलं गेलं आहे ते वास्तव बनून समोर ठाकलेलं आज आपण अनुभवतो आहोत. वृत्तपत्राचं पहिलं पानच काय, त्यापुढची पानंही जाहिरातींनी गिळंकृत केली आहेत. संपादकीय पान तेवढं व्यापायचं उरलंय. ज्यांनी पत्रकारिता विकायला काढली, त्यांची झपाटय़ानं आर्थिक, लौकिक प्रगती होताना दिसते आहे. काहीही ‘मॅनेज’ करता येतं, हे तर मागल्या निवडणुकीत आपण प्रत्यक्षच अनुभवलं. जे आमिषांना, दबावांना बळी पडत नाहीत ते मागे पडतात. सर्वार्थानं. अशांना मग एकतर संपवलं जातं, किंवा पत्रकारितेतून तरी बाहेर फेकलं जातं. अशा परिस्थितीत कुठं उरणार पत्रकारितेतली मूल्यं? साधनशुचिता?
लेखक म्हणून क्षितीज पटवर्धन यांनी अनेक आशयसूत्रांचं हे शिवधनुष्य लीलया पेललं आहेच; शिवाय दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपल्यातली अफाट गुणवत्ता यात प्रकट केली आहे. अर्थात नाटकात तपशिलांच्या काही नगण्य चुका आणि योगायोगाच्या गोष्टीही आहेत; परंतु त्याकडे काणाडोळा करावा इतक्या विलक्षण ऊर्जेचं हे प्रत्ययकारी नाटक आहे. प्रदीप मुळ्ये यांनी ८९ सालातलं पुण्यातल्या एका वृत्तपत्राचं वास्तवदर्शी कार्यालय साकारावं म्हणजे किती? प्रतिभावंत नेपथ्यकाराचं सर्जनच त्यातून प्रकट होतं. नाटकाची प्रकाशयोजनाही त्यांचीच. बल्बच्या भगभगीत पिवळ्या प्रकाशात वर्तमानपत्रांच्या कार्यालयात त्याकाळी रात्रपाळीचं काम चाले. वृत्तपत्रांच्या कार्यशैलीतील स्थित्यंतरांची तेव्हा नुकतीच सुरुवात झाली होती. याची दखलही नेपथ्यात जाणवते. पोटमाळ्याला दिलेला बांबूचा टेकू हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला दिलेला प्रतीकात्मक टेकूच आहे. ध्वनिआरेखक अनमोल भावे यांनी वृत्तपत्रीय कार्यालयाचा अविभाज्य भाग असलेल्या प्रिटिंग प्रेसमधील छपाईचा आवाज पाश्र्वभूमीला सतत जागता ठेवून नाटकाचं वास्तवदर्शीत्व अधोरेखित केलं आहे. दीपा मेहता यांची वेशभूषाही संहितेशी इमान राखणारी.
हे नाटक सामर्थ्यांनं तोललं आहे ते कलाकारांनी. जितेंद्र जोशी यांनी मिलिंद भागवतची सर्वार्थानं घुसमट, तगमग, त्याचं आतून फुटणं, अव्यभिचारी तत्त्वनिष्ठा हे तर अभिव्यक्तीच्या आरोह-अवरोहांतून प्रकट केलंच; त्याचवेळी तत्त्वनिष्ठेच्या कसोटीचा जो क्षण- माणसाचं जगणंच त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह होऊन उभं ठाकतं, तेव्हाही तो अविचल राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याच्यातला ‘माणूस’ स्वप्नाच्या जीवनमरणाच्या लढाईनं हादरतो, हतबल होतो, दुविधेत पडतो. पत्रकारितेतलं आपलं तत्त्व आणि सत्त्व जपायचं, तर स्वप्नाचं भविष्य अंध:कारमय होणार. आणि तिला मदतीचा हात द्यावा, तर आपल्या जीवननिष्ठेशी प्रतारणा होणार. काय करायचं काय अशावेळी? कुठला मार्ग पत्करायचा? जितेंद्र जोशींनी हे भीषण वैचारिक आणि भावनिक द्वंद्व त्यातल्या खाचखळग्यांसह अचूक हेरलं आहे. स्वप्ना आणि त्याच्यातलं अलवार नातंही या द्वंद्वात पणाला लागतं.
स्वप्नाही (गिरिजा ओक-गोडबोले) परिस्थितीच्या कोंडीत सापडलीय. ज्याच्यासोबत कधीकाळी आयुष्याची रंगीत स्वप्नं विणली, ज्या माणसाला आपण आतून-बाहेरून लख्खपणे ओळखतो, त्याला आपल्या स्वार्थासाठी त्याच्या तत्त्वांशी तडजोड करायला लावायची? त्याला स्वत:च्याच नजरेत छोटं करायचं? नाही. पण मग आपल्या अंधाऱ्या भविष्याचं काय? यातून काही मधला मार्ग नाही का निघू शकणार? त्याचा आत्मसन्मानही टिकावा, त्याची तत्त्वं जपली जावीत आणि आपलीही परिस्थितीच्या कोंडीतून सुटका व्हावी.. असं नाहीच का घडू शकत? हा भावकल्लोळी प्रवास गिरिजा ओक यांनी सूक्ष्म तपशील भरत ज्या ताकदीनं केला आहे त्याला खरंच तोड नाही. जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक यांच्या कलाकीर्दीतील या संस्मरणीय भूमिका ठराव्यात. रोहित हळदीकर (उमेश भोसले) यांनी होतकरू पत्रकाराचं स्वप्नील भाबडेपण लक्षणीय केलं आहे.
गेल्या कितीतरी वर्षांत इतकं नितांतसुंदर, आशयसंपृक्त नाटक रंगभूमीवर आलेलं नाही. चुकवू नये असं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2015 1:08 am

Web Title: two special
Next Stories
1 ‘मार्व्हल’च्या चित्रपटात प्रथमच मायकल डग्लस
2 हिला ओळखलेत का?
3 पाहाः ‘बजरंगी भाईजान’मधील ईद स्पेशल ‘आज की पार्टी’ गाणे
Just Now!
X