News Flash

तमाशा रंगभूमीवरील अस्सल लोककलावंत कांताबाई सातारकर यांचं निधन

काही दिवसांपूर्वीच झाली होती करोनाची लागण

तमाशाच्या रंगभूमीवर शिवाजी संभाजी या पुरुषी भूमिका रंगवणाऱ्या अस्सल लोककलावंत कांताबाई सातारकर यांचं निधन झालंय. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी संगनमेर इथे अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या त्या आई आहेत. काही दिवसांपूर्वीच त्या करोना पॉझिटिव्ह आल्या होत्या.

ज्येष्ठ लोककलावंत कांताबाईं सातारकर यांच्या तमाशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे संपूर्ण कुटुंब आजही एकत्र राहून तमाशा रंगभूमीची सेवा करीत आहे. त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघुवीर खेडकर, मुली अनिता, अलका, मंदाराणी, नातू मोहित व अभिजित, नातसून अमृता, नात पूजा, जावई दीपकराव मेंगजी, गोतान्बर सौन्दाडेकर, राजेश खोल्लम असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वीच रघुवीर खेडकर यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य पॉझिटिव्ह होते. त्यातील काही जण करोनातून बाहेर पडून त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. कांताबाई सातारकर यांच्यावर मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आजच अंतिमसंस्कार करण्यात येणार असल्याचं समजतंय.

त्यांच्या निधनानंतर लोककलेची मोठी परंपरा पुढे घेऊन जाणारी एक बहुआयामी चेहरा हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सन २००५ मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात तंबू लाऊन सिने, नाट्य सृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमानही त्यांना मिळाला आहे.

एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे खचितच आढळतील. कांताबाईनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब वठवल्या की पुरुष कलाकारांना त्या भूमिकांची नक्कल करावी वाटायचे.

‘रायगडची राणी’ या वगनाट्यासोबतच ‘गवळ्याची रंभा’, ‘गोविंदा गोपाळा’, ‘१८५७ चा दरोडा’, ‘तडा गेलेला घडा’, ‘अधुरे माझे स्वप्न राहिले’, ‘कलंकिता मी धन्य झाले’, ‘असे पुढारी आमचे वैरी’, ‘डोम्या नाग अर्थात सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘कोंढाण्यावर स्वारी’ आदी वगनाट्यात कांताबाईनी आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली.

वयाच्या नवव्या सुरू केला तमाशा रंगभूमीवरचा प्रवास
गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी दगडखाणीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्या पोटी कांताबाईंचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबात तमाशाचा कोणताही वारसा नव्हता. गुजरातमधून पुढे त्यांचे आईवडील सातारा या मूळगावी आले. साताऱ्याला आल्यावर कांताबाई आपल्या बाल सवंगड्यांसोबत खेळताना नृत्य करायच्या. साताऱ्याला विविध उत्सवप्रसंगी मेळे व्हायचे. या मेळ्यातील नर्तिका पायात घुंगरे बांधून नृत्य करायच्या ते कांताबाईंना मनापासून आवडायचे. मेळ्यात बघितलेल्या नृत्याची नक्कल करताना सुतळीच्या तोड्याला बांधलेल्या बाभळीच्या वाळलेल्या शेंगा घुंगरे म्हणून त्या पायात बांधायच्या. कोणत्याही गुरुविना छोट्या मित्र मैत्रिणींसमोर नृत्य सादर करता करता वयाच्या नवव्या वर्षी त्यांना साताऱ्यातील नवझंकार मेळ्यात नृत्याची संधी मिळाली आणि त्यांचा कलाप्रवास सुरु झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 7:16 pm

Web Title: veteran tamasha artist kantabai satarkar passed away prp 93
Next Stories
1 धर्मेंद्र यांचा नातू करण देओलने सावत्र आजी हेमा मालिनीचं केलं कौतुक; म्हणाला, “एक शानदार अभिनेत्री”
2 ‘शाहरुखसोबत बीडी शेअर करायचो’, मनोज वाजपेयीने सांगितला किस्सा
3 आयफोनवर चित्रित झालेला पहिला मराठी ‘पिच्चर’
Just Now!
X