उरी : द सर्जिकल स्ट्राइक,मसान, संजू अशा असंख्य चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे विकी कौशल. उत्तम अभिनयशैली आणि संवाद कौशल्याच्या जोरावर विकीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. विशेष म्हणजे विकी आता त्याच्या आगामी चित्रपटांकडे वळला असून त्याने ‘शुभ आरंभ’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे.
अभिनेता विकी कौशल लवकरच ‘शुभ आरंभ’ या चित्रपटात झळकणार असून त्याने सेटवरचा पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो चित्रपटाची स्क्रीप्ट वाचताना दिसत आहे. विशेष म्हणजे आगामी चित्रपटासाठी विकी अत्यंत उत्साही असल्याचं दिसून येत आहे.
View this post on Instagram
हा फोटो शेअर करत त्याने शुभ आरंभ असं कॅप्शन दिलं आहे. सध्या या चित्रपटाविषयी विकीने फारशी माहिती उघड केलेली नाही. त्यामुळे या चित्रपटाविषयी आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, या चित्रपटात त्याच्यासोबत नेमकं कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहेत.
दरम्यान, विकी अलिकडेच ‘भूत- द हॉंटेड शिप’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटानंतर तो लवकरच शुभ आरंभ आणि सरदार उधम सिंह या चित्रपटात झळकणार आहे.