करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. पण आता हळूहळू पुन्हा सुरु होऊ लागली आहेत. नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतिचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मास्टर’ चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दोन दिवसातच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आता हा चित्रपट हिंदीमध्ये करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

कबीर सिंग चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी ‘मास्टर’ चित्रपटाची लोकप्रियता पाहता चित्रपटाचे हक्क खरेदी केल्याचे समोर आले आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, मुराद खेतानी दोन आठवड्यांपूर्वी मास्टर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी हैदराबदला गेले होते. त्यांना चित्रपट प्रचंड आवडला आणि त्यांनी चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत. त्यासाठी त्यांनी मोठी रक्कमही दिली असल्याचे म्हटले जाते.

‘मास्टर’ या चित्रपटात अॅक्शनचा भरणा आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराजने केले आहे. या चित्रपटात विजय सेतुपतिसोबतच मालविका मोहनन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या रिमेकसाठी बॉलिवूडमधील दोन कलाकारांची निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.