स्वात खोऱ्यासारख्या दुर्गम भागात राहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धार्मिक मूलतत्त्ववाद आणि जहालपणातून होणारी हिंसा यांच्या कचाट्यात सापडूनसुद्धा आपल्या मार्गावरून चालू पाहणाऱ्या एका जिद्दी मुलीची कहाणी, म्हणजेच मलाला युसूफझाई हिची कहाणी चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गुल मकई’ असं चित्रपटाचं नाव असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला.

जिहादच्या नावाखाली तालिबानकडून सुरू असलेला अत्याचार आणि तेव्हाच मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या मलालाचा उदय या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. अवघ्या दीड मिनिटाच्या या टीझरची सुरुवातच तालिबानच्या अत्याचारापासून होते. त्यानंतर समोर येतो तो कुमारवयीन मलालाचा चेहरा. ‘माझं नाव मलाला का ठेवलं? त्याचा अर्थ तर दु:खाने त्रस्त असा होतो ना,’ हा प्रश्न ती विचारते. तेव्हा मलाला नाव ठेवण्यामागची कथासुद्धा या टीझरमध्ये ऐकायला मिळते.

वाचा : फुटबॉल प्रशिक्षकाच्या बायोपिकमध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत 

अभिनेत्री रिम शेख यामध्ये मलालाची भूमिका साकारत आहे. त्यासोबतच दिव्या दत्ता आणि अतुल कुलकर्णी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मलालाच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती म्हणजेच तिच्या वडिलांची भूमिका अतुल कुलकर्णी साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. तालिबानमधील धर्माध शक्तींच्या विरोधात लढा देऊन तिथल्या मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या मलाला युसुफझाईची ही प्रेरणादायी कथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.