दिवाळी हा उत्साहाचा अन् आनंदाचा सण आहे. दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशात सारा देश उजळून निघतो. जमिनीवर रंगीबेरंगी रांगोळ्यांची आरास व आकाशात फटाक्यांची रोषणाई असं काहीसं वातावरण असतं. परंतु दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या या फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायु प्रदुषणही मोठ्या प्रमाणावर होतं. आकाशात उडणारे अनेक पक्षी जखमी होतात. मात्र दिवाळीत उद्भवणाऱ्या या समस्येवर अभिनेता जिशान अय्युब याने एक अनोखा उपाय सुचवला आहे. प्रदुषण न करता फटाके फोडण्याची टेकनिक त्याने दाखवली आहे.

अवश्य पाहा – ‘नग्नता हा गुन्हा असेल तर नागा साधूंना अटक करा’; अभिनेत्रीचा मिलिंद सोमणला पाठिंबा

जिशान अय्युब सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो रोखठोकपणे आपली मतं मांडतो. यावेळी त्याने दिवाळीच्या निमित्ताने फटाक्यांवर भाष्य केलं आहे. त्याने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर आहे. या व्हिडीओमधील व्यक्ती फटाके फोडण्याची एक नवी टेकनिक दाखवत आहे. सर्वप्रथम तो फटाक्यांची वात पेटवल्याचं नाटक करतो. त्यानंतर शेजारी ठेवलेल्या एका लोखंडी पत्र्यावर तो जोरदार फटका मारुन फटाके फोडल्याचा आवाज काढतो. अशा प्रकारे फटाके फोडा ध्वनी प्रदुषण होणार नाही असा गंमतीशीर सल्ला जिशानने दिला आहे. त्याचा हा अनोखा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – नखरे करणं अभिनेत्रीला पडलं भारी; १८ व्या दिवशी मालिकेतून काढून टाकलं

दिवाळीतील प्रदूषण पक्ष्यांच्या मुळावर

दिवाळीच्या दिवसात सायंकाळी सहानंतर ध्वनिप्रदूषणाचा स्तर सामान्य स्तरापेक्षा सुमारे ४५ ते ५० टक्क्यांनी वाढतो. व्यावसायिक भागात ६५ डेसिबल्स, औद्योगिक भागात ७५ ते ८५ डेसिबल आणि निवासी भागात ५५ डेसिबलची ध्वनिमर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, याचे पालन कुठेच होत नाही. प्रकाश फेकणाऱ्या फटाक्यांमुळे पक्ष्यांच्या डोळ्यांवर अत्यंत विपरीत परिणाम होतो. अतितीव्र प्रकाशामुळे पक्ष्यांना आंधळेपणा येतो आणि अंधारात चाचपडल्यामुळे भिंतीवर आदळूनही त्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. फटाक्यांच्या मोठय़ा आवाजाने पक्षी खाली पडून जखमी आणि मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. रॉकेट्समुळे आणि वर जाऊन फुटणाऱ्या फटाक्यांमुळे पक्ष्यांचा अधिवास म्हणजेच झाडावरील त्यांची घरटी जळतात. पशुपक्ष्यांची ध्वनी ऐकण्याची क्षमता मानवापेक्षा सात पटीने अधिक असते. या आवाजामुळे पक्ष्यांच्या कानाच्या नसा तुटण्याची दाट शक्यता असते. फटाक्यांचा सर्वाधिक परिणाम चिमण्यांवर होतो. एकटय़ा चेन्नईत दरवर्षी दिवाळीच्या दिवसात १३ टक्के चिमण्यांचा मृत्यू ध्वनिप्रदूषणामुळे होत असल्याचे समोर आले आहे.