बॉक्स ऑफिसवर अल्पावधीत चर्चेत आलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होत आहे. खुद्द अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुड्डानं मुंबईत बोलताना ही माहिती दिली आहे. येत्या २८ मे रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हीच तारीख का निवडली? यावरही रणदीप हुड्डानं भाष्य केलं आहे. मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातर्फे रणदीप हुड्डाला सन्मानित करण्यात आलं. यावेळे केलेल्या भाषणात रणदीपनं सावरकर चित्रपटाविषयी आपली भूमिका मांडली.

‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’, या ओळींनी आपल्या भाषणाला सुरुवात करणाऱ्या रणदीपनं सावरकर चित्रपट बनवण्यामागे कोणती प्रेरणा होती, याविषयी भूमिका मांडली आहे. “स्वातंत्र्यवीर सारवकर स्मारकाकडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यासाठी मी आभार मानतो. मलाही आधी सावरकरांबाबत एवढी माहिती नव्हती जेवढी मला असायला हवी होती. मी जेव्हा त्यांच्या कामाचा अभ्यास सुरू केला, तेव्हा मला हे माहिती नव्हतं की वजन कमी करावं लागेल, काळ्या पाण्याचा अनुभव घ्यावा लागेल”, असं रणदीप हुड्डा यावेळी म्हणाला.

“सावरकरांवरचा हा चित्रपट बनवण्यासाठी मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा मला याचा साक्षात्कार झाला की ही एक अशी कथा आहे जी योगदान, बलिदानाची आहे. एकाच ध्येयासाठी वाहून घेतलेल्या एका संपूर्ण आयुष्याची ही कथा आहे. त्यांचं योगदान लाखो-करोडो भारतीयांपर्यंत का पोहोचवलं गेलं नाही? ते का लपवून ठेवलं गेलं? त्यामुळे मी त्या रागात हा चित्रपट बनवला. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी हा चित्रपट बनवला. ते फक्त महान स्वातंत्र्यसैनिकच नव्हते, तर फार मोठे लेखक-कवी होते, समाजसुधारक होते. नव्या युगातील वैज्ञानिक विचारांचे अग्रणी व्यक्ती होते”, अशा शब्दांत रणदीप हुड्डानं सावरकर चित्रपट बनवण्यामागची त्याची प्रेरणा काय होती यावर उत्तर दिलं.

“सावरकर कालातीत, आजही त्यांचे विचार…”

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा त्यांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत, असं रणदीप हुड्डा म्हणाला. “भारतात आज सावरकरांचे विचार एवढे लागू आहेत जेवढे इतर कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचे विचार लागू नाहीत. त्यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर साकारण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. लोकांना हा चित्रपट आवडला याचा मला आनंद आहे”, असं तो म्हणाला.

लपून-छपून चित्रपट पाहायचा रणदीप!

दरम्यान, सावरकर चित्रपटाचे शो ज्या थिएटर्समध्ये लागायचे, तिथे रणदीप लपून-छपून जाऊन बसायचा, असं तो म्हणाला. “मी एखाद्या शोमध्ये लपून-छपून जाऊन बसायचो. मी शो संपण्याची वाट पाहायचो. शो संपल्यानंतर नाटकाच्या शेवटी टाळ्या वाजतात, तशा टाळ्या वाजायच्या. मी तेव्हा कुठल्यातरी कोपऱ्यात बसून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आणि या सिनेमासाठी मेहनत घेणाऱ्या माझ्या टीमचे आभार मानतो. माझ्या आयुष्यातील आत्तापर्यंतची ही सर्वात महत्त्वाची व्यक्तीरेखा होती”, असं तो म्हणाला.

“मी माझं घर विकून…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य

ओटीटीसाठी २८ मे तारीखच का?

दरम्यान, येत्या २८ मे रोजी, अर्थात मंगळवारी स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. त्यासाठी हीच तारीख का निवडली, यावरही रणदीपनं भाष्य केलं. “आता हा चित्रपट २८ मे रोजी ओटीटीवर येत आहे. मी त्यासाठी फार भांडून ही तारीख घेतली. त्यांच्या जन्मदिनी जसं आपल्या नवीन संसद भवनाचं उद्धाटन झालं, तसंच त्यांच्या जन्मदिनी हा चित्रपट ओटीटीवर यावा असा माझा आग्रह होता”, असं रणदीपनं नमूद केलं.