एखाद्या कलाकारासाठी त्याचा अभिनय आणि त्याची एखादी भूमिका हिच त्याची ओळख बनते. मालिका विश्वातील असचं एक गाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते शिवाजी साटम. शिवाजी साटम यांनी आजवर अनेक मराठी आणि हिंदी मालिका तसचं सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. त्याचसोबत रंगभूमीवरील अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. मात्र प्रेक्षकांच्या मनात घरं केलं ते त्यांच्या सीआयडी या शोमधील एसीपी प्रद्युमन या भूमिकेने. शिवाजी साटम यांचा आज वाढदिवस आहे. त्याच निमित्ताने त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणू घेणार आहेत.

बँकेत कॅशियर म्हणून केलं काम
घराघरात एसीपी प्रद्युमन म्हणून पोहचलेले शिवाजी साटम यांनी एकेकाळी बँकेत कॅशियरची नोकरी केली आहे. शिवाजी साटम यांचा जन्म 21 एप्रिल 1950 ला मुंबईतील माहिममध्ये झाला. शिवाजी साटम यांनी बिझनेस एडमिनिस्ट्रेशनचा डिप्लोमा पूर्ण केला आणि ते बँकेत कॅशियरची नोकरी करण्यासाठी रुजू झाले. मात्र अभिनयाची आवड असल्याने त्यांनी अभिनयाचे धडे घेण्यास सुरुवात केली. बँकेतील एका कार्यक्रमात त्यांनी नाटकात अभिनय केला. त्यानंतर मराठी रंगभूमीवरील दिग्गज अभिनेते बाळ धुरी यांनी शिवाजी साटम यांना एका नाटकात अभिनयाची संधी दिली.

1980 सालात आलेल्या ‘रिश्ते नाते’ या मालिकेतून त्यांनी टेलिव्हिजनवर एण्ट्री केली. ‘100 डेज’, ‘इंग्लिश अगस्त’, ‘यशवंत’, ‘युगपुरुष’, ‘चाइना गेट’, ‘नायक’, ‘जोड़ी नंबर 1’, ‘कुरुक्षेत्र’, ‘फिलहाल’, ‘जिस हेस मे गंगा रेहता है’ अशा अनेक सिनेमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.

सीआयडी मुळे मिळाली नवी ओळख
1998 सालात सुरु झालेल्या ‘सीआयडी’ या शोमध्ये शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युमनची भूमिका साकारली. जवळपास दोन दशकं या शोने प्रेक्षकांची पसंती मिळवली. या शोमुळे शिवाजी साटम एसीपी प्रद्युमनच्या रुपात घराघात पोहचले. या शोमधी त्यांचे कुछ तो गड़बड़ है दया, पता लगाना पड़ेगा’ तसचं ‘दया दरवाजा तोड दो’ हे डायलॉग प्रचंड गाजले. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी या डायलॉगमागची कहाणी सांगितली होती.

वाचा : “..दिखावा करण्याची गरज नाही”; फिरायला जाणाऱ्या सेलिब्रिटींवर श्रुति हसन नाराज

शिवाजी साटम यांनी त्यांच्या लोकप्रिय डायलॉगचा या शोमध्ये कसा समावेश झाला याबद्दल सांगितलं. ते म्हणाले, “एक दिवस मी शोच्या क्रिएटरसोबत शोवर चर्चा करत होतो. तेव्हा मी सहज म्हणालो, काय झाल? तेव्हा ते क्रिएटर म्हणाले, ‘आता तू ज्या अंदाजात हातवारे करत काय झालं म्हणालास तेच तुझ्या एसीपीच्या भूमिकेत तू आणू शकतोस का?” अशा प्रकारे हा डायलॉग शोमध्ये आल्याचं त्यांनी सांगितलं.

‘सीआयडी’ या शोला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती. अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या शोने खिळवून ठेवलं होतं.