scorecardresearch

अजित पवार यांची आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’वर प्रतिक्रिया, म्हणाले “चित्रपट बॉयकॉट करावा असं…”

आमिर खानच्या चित्रपटावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया.

अजित पवार यांची आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’वर प्रतिक्रिया, म्हणाले “चित्रपट बॉयकॉट करावा असं…”
अजित पवार यांनी आमिर खानच्या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट बराच गाजतोय. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रदर्शनाआधीही सोशल मीडियावर बराच चर्चेत होता. या चित्रपटावर बहिष्कार घालण्यासाठी ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड सुरू करण्यात आला होता. आतापर्यंत यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या यादीत राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांची भर पडली आहे. अजित पवार यांनी आमिर खानच्या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना नुकत्याच एका पत्रकार परिषदेत, ‘आमिर खानचा चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ हिंदू विरोधी असल्याचं बोललं जात असून हिंदू विरोधी लोकच हा चित्रपट पाहणार असल्याचं बोललं जात आहे. तर यावर तुमचं मत काय?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात मत मांडलं.
आणखी वाचा- “६० वर्षांचा अभिनेता २० वर्षीय अभिनेत्रींसोबत रोमान्स करतो आणि…”, विवेक अग्निहोत्रींची आमिर खानवर अप्रत्यक्ष टीका

आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, “जो चित्रपट मी पाहिला नाही त्यावर मी माझं मत कसं व्यक्त करू. असे अनेक चित्रपट आले, ज्यावर बहिष्कार घालावा किंवा कोणी पाहायला जाऊ नका असं बोललं गेलं. पण मला तर वाटतं लोकांनी यांचे चित्रपट जास्तीत जास्त पाहावे यासाठी हे केलं जातंय. जेव्हा ‘पद्मावती’चा ‘पद्मावत’ झाला त्यावेळी अरे यात काय नवीन म्हणून लोकांनी तो पाहिला. आता हा बॉयकॉट करावा असा ट्रेंड सुरू करण्यात आलाय. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा का सुरू आहे म्हणून लोक पाहणार. चित्रपटासाठी ही एक प्रकारचा पब्लिसिटी स्टंट असण्याचीही शक्यता आहे.”

अजित पवार पुढे म्हणाले, “जेव्हा चित्रपट तयार होतो. त्यावेळी त्यातून देशाच्या विरोधात किंवा आक्षेपार्ह अशी कोणतीही गोष्ट जाऊ नये यासाठी सेन्सॉर बोर्ड असतो. ते चित्रपट पाहून त्यातील अनावश्यक किंवा आक्षेपार्ह दृश्य काढून मगच त्याच्या प्रदर्शनासाठी आवश्यक असलेलं प्रमाणपत्र देतात. त्यामुळे ते त्यावर बंदी आणतील. अनेकदा असं होतं की हे अशी आंदोलन करणारेच गुपचूप जाऊन चित्रपट पाहून येतात.”

आणखी वाचा- आमिर खानला धक्का, ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शित होताच ऑनलाइन वेबसाइटवर झाला लीक

दरम्यान आमिर खान आणि करीना कपूर खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. देशातील तब्बल १०० लोकेशनवर या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आहे. अद्वैत चंदन यांचं दिग्दर्शन असेलल्या या चित्रपटाची पटकथा एरिक रोथ आणि अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या