लॉकडाउनच्या काळात रामानंद सागर यांची ८०च्या दशकातील लोकप्रिय मालिका ‘रामायण’ ही पुन्हा दूरदर्शन वाहिनीवर दाखवण्यात येत आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकार पुन्हा एका चर्चेत आहेत. मग ते रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल असो वा रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका निभावणारी अभिनेत्री अपराजिता भूषण असो. सर्वच कलाकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. रामायणातील काही कलाकार तर लाइमलाइटपासून दूर असल्याचे देखील समोर आले आहे. अशातच आपण रामायणातील मंदोदरीबद्दल जाणून घेणार आहोत.

रामायणात रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अपराजिता भूषण. अपराजिता ही चित्रपटसृष्टीमधील दिग्दज अभिनेते भारत भूषण यांची मुलगी आहे. रामायण पुन्हा प्रदर्शित होत असताना अपराजिता यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामुलाखतीमध्ये त्यांनी रावणाच्या पत्नीची भूमिका का साकारली या मागचे कारण सांगितले आहे.

अपराजिता भूषण या सुरुवातीला डबिंगचे काम करत होत्या. त्यांना कधीही अभिनय क्षेत्राकडे वळायचे नव्हते. पण अचानक त्यांच्या पतीचे निधन झाल्यामुळे त्यांना अभिनय क्षेत्राकडे वळावे लागले. त्यावेळी त्यांना दोन मुले होती. इतक्या मोठ्या अभिनेत्याची मुलगी असताना देखील अपराजिता यांना रामायणातील मंदोदरी या पात्रासाठी ऑडीशन द्यावे लागले होते. रामानंद सागर यांनी अपराजिता यांचे ऑडीशन घेतल्यानंतर त्यांचा मंदोदरीचा शोध पूर्ण झाल्याचे म्हटले होते.

रामायण मालिकेने नंतर अपराजिता यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. जवळपास १० ते १२ वर्षे त्यांनी वेगवगेळ्या भूमिका साकारल्या. अपराजिता यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये ५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता त्या चित्रपटसृष्टीपासून लांब आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. त्यांनी १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘गुप्त’ या चित्रपटात शेवटची भूमिका साकारली होती.