कॉमेडियन भारती सिंह हे टीव्ही इंडस्ट्रीतलं मोठं नाव तर आहे. हे नावं तिने स्वबळावर कमावले आहे. भारतीच्या उत्तम कॉमेडी टायमिंगमुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पती हर्ष लिंबाचिया देखील एक लोकप्रिय लेखक आणि अभिनेता आहे. त्याने बऱ्याच कॉमेडी शोसाठी स्क्रिप्टस् लिहिल्या आहेत. मात्र हर्षने प्रसिद्धी मिळवण्यासाठी भारतीचा वापर केला आहे, असा काही लोकांचा दावा आहे. या कारणामुळे हर्षला अनेकदा ट्रोल केले जाते. यावर आता भारतीने तिचे मौन सोडले आहे. तिने या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.
भारतीच्या लोकप्रियतेमुळे हर्ष लोकप्रिय आहे. ट्रोलर्सच्या या वक्तव्यावर भारती सडेतोड उत्तर देत एका मुलाखतीत म्हणाली, “आमच्यात काय बॉण्ड आहे हे त्यांना माहिती नाही, पण मी हे सांगते की हर्ष जेव्हा डायलॉग लिहितो तेव्हाचं भारती बोलते. आम्ही एकमेकांना शिवाय अपूर्ण आहोत आणि जेव्हा एकत्र काम करतो तेव्हा धम्माल करतो. मला हर्षने लिहिलेल्या स्क्रिप्टवर काम करायला आवडते कारण तो मला ओळखतो. त्यामुळे आम्हाला फरक नाही पडत की लोकांना काय वाटते करण आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत.”
यावर हर्ष म्हणाला “माझ्यासाठी काही फार मोठी गोष्ट नाही आणि आम्हाला या ट्रोलर्सबद्दल कधीच काही वाटले नाही. लोक काय बोलतील याचा फरक पण पडला नाही.” पुढे हर्षला जेव्हा विचारण्यात आले की आता तो फक्त लेखक नाही तर टीव्हीवरचा प्रसिद्ध चेहरा आहे तर त्याला वेगळी वागणुक दिली जाते का? यावर उत्तर देताना तो म्हणाला, “मी लेखन सोडले नाही मी अजूनही तोच माणूस आहे. फक्त आता लोक मला थोडा आदर देतात आणि कोणी थांबवून ठेवत नाही.” दरम्यान, हर्ष आणि भारती सध्या कलर्सवर ‘डान्स दिवाने 3’ होस्ट करताना दिसत आहेत. भारती ‘द कपिल शर्मा शो’चाही एक भाग आहे.”
भारती आणि हर्षची भेट ‘कॉमेडी सर्कस’ च्या सेटवर झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सात वर्षे डेट केल्यानंतर २०१७ साली ते लग्न बंधनात अडकले. ‘खतरो के खिलाडी’, ‘खतरा खतरा खतरा’, ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ सारख्या अनेक शोमध्ये एकत्र काम केले आहे. लवकरचं त्यांचा पाहिलं प्रोजेक्ट ‘द इंडिया गेम शो’ ते ‘भारती टीव्ही’ या यूट्यूब चॅनेलवर लाँच करणार आहेत. यासाठी ते दुबईला रवाना झाले आहेत. या शोमध्ये ५० हुन अधिक लोकप्रिय कलाकार सहभागी होऊन मजेशीर गेम खेळताना दिसतील.