बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटांचा चाहतावर्गही बराच मोठा आहे. अॅक्शन आणि मसालेदार कथा असलेले दाक्षिणात्य चित्रपट डब झाल्यानंतरही टीव्हीवर विशेष गाजतात. त्यातच चिरंजीवी, महेश बाबू,रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर या कलाकारांचा चाहतावर्ग अफाट आहे. यामध्ये उत्तम संवाद कौशल्य आणि अभिनय याच्या जोरावर ज्युनिअर एनटीआरने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान मिळविलं आहे. विशेष म्हणजे ज्युनिअर एनटीआर या नावाने प्रसिद्ध असलेल्या या कलाकाराचं हे खरं नाव नसून दुसरंच आहे.
दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता ज्युनिअर एनटीआरचा वाढदिवस आहे. २० मे १९८३ मध्ये हैदराबादमध्ये ज्युनिअर एनटीआरचा जन्म झाला. दाक्षिणात्य सुपरस्टार एनटी रामाराव यांता नातू असलेल्या या अभिनेत्याने लहान असतानाच बालकलाकार म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ब्रह्मर्षि विश्वामित्र या चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून काम केलं होतं.
ज्युनिअर एनटीआरने त्याच्या आजोबांच्या म्हणजेच एन.टी. रामा राव यांच्या चित्रपटातून अभिनेता म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं. विशेष म्हणजे तो एन.टी. रामा राव यांचा नातू असल्यामुळे लोक त्याला ज्युनिअर एनटीआर याच नावाने ओळखू लागले. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच त्याला ही नवीन ओळख मिळाली होती. परंतु ज्युनिअर एनटीआरचं खरं नाव तारक असं आहे.
दरम्यान, ज्युनिअर एनटीआरची दाक्षिणात्य कलाविश्वाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही क्रेझ पाहायला मिळते. त्याला अभिनयाव्यतिरिक्त तो एक उत्तम डान्सरदेखील आहे. तो एक ट्रेण्ड डान्सर आहे. तसंच त्याने कुचिपूडी हा नृत्यप्रकारही शिकलेला आहे.

