बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने मोठ्या चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी त्यांच्या वक्तव्यामुळे तर कधी त्यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ किंवा फोटोंमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या चर्चेत आला आहे.

काय म्हणाले नेटकरी?

आमिर खान नुकताच आपल्या दोन्ही मुलांसह एका कार्यक्रमात दिसून आला. या कार्यक्रमातून बाहेर पडताना पापाराझींनी आमिर खान, जुनैद खान, आझाद या तिघांचे काढलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या बापलेकांचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली असून हे तिघे भाऊ वाटत असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावनेदेखील पापाराझींसाठी पोझ दिली.

आमिर खानने दोन लग्न केली होती. जुनैद हा मोठा मुलगा असून तो रीना दत्ता आणि आमिर खान यांचा मुलगा आहे, तर आझाद हा किरण राव आणि आमिर खानचा मुलगा आहे. आमिर खानचा दोन्ही पत्नींसोबत घटस्फोट झाला आहे. वेगळे झाल्यानंतरही हे संपूर्ण कुटुंब अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसते.

हेही वाचा:क्रांती रेडकरच्या आईने चार्जर पाठवण्यासाठी लढवली शक्कल, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “समीर वानखेडे यांच्या सासूबाई…”

जुनैदने महाराज या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी जुनैदच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. याबरोबरच, चित्रपटाला उत्तम प्रतिसाददेखील मिळाला आहे. याबद्दल बोलताना आमिर खानने जुनैदबद्दल अभिमान व्यक्त केला होता. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने म्हटले होते, “मला तर याचा आनंद होतो की, त्याने सगळे स्वत:च्या हिमतीवर केले. माझ्याकडून कोणतीही मदत घेतली नाही. हा चित्रपटदेखील त्याने मेहनतीने मिळवला. त्याच्या पदार्पणावेळी मी तणावात होतो, मात्र प्रेक्षकांनी ज्याप्रकारे जुनैदच्या पहिल्या चित्रपटाला प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्याची सुरुवात चांगली झाली आहे”, अशा भावना त्याने व्यक्त केल्या होत्या.

सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखतीत जुनैदने आपल्या कुटुंबाविषयी बोलताना, माझे कुटुंब पाठिंबा देणारे असून खुल्या विचाराचे असल्याचे वक्तव्य केले होते. त्याने म्हटले होते, “माझ्या वडिलांनी म्हणजेच आमिरने करिअरच्या बाबतीत मला कायमच पाठिंबा दिला आहे, कधीही त्यांनी ढवळाढवळ केली नाही. त्यांचे मत, निर्णय कधीही आम्हा मुलांवर थोपवले नाहीत. चित्रपटांबाबतीत ते कोणत्याही प्रश्नाचे सहज उत्तर देऊ शकतात. जेव्हा अपयश येते तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्यावर होतोच, पण त्या अपयशाचा स्वीकार करण्यासाठी ते काही वेळ घेतात आणि त्यानंतर कुठे चुकलं यावर विचार करतात आणि पुढे जातात, त्या अपयशामध्ये अडकून रहात नाहीत.

जुनैदने आईबद्दल म्हणजेच रिना दत्ताबद्दल बोलताना म्हटले होते, “माझ्या व्यक्तिमत्वाला आकार आईने दिला आहे, तिचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम आहे. तिने मला मोठे केले आहे. वडील प्रेमळ आहेत, पण ते त्यांच्या आयुष्यात व्यग्र होते. तर मला कोणी जर वाढवले असेल, तर ती माझी आई आहे. पण, जर मी कोणत्या अडचणीत असेल तर मी आई, वडील किंवा इराला फोन करतो आणि ते सगळे माझ्यासाठी असतात. माझे वडील त्यांच्या कामात कितीही व्यग्र असले तरी मला जेव्हा त्यांची गरज असते तेव्हा ते मला हवा तितका वेळ देतात. माझ्याकडे मला कायम पाठिंबा देणारे कुटुंब आहे”, असे त्याने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचे तर लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात तो दिसणार आहे. जुनैद खान खुशी कपूरबरोबर एका रोमँटिक कॉमेडी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.