अभिनेता आमिर खान त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशातच अभिनेत्याने एका मुलाखतीमधून त्याची आई झीनत खान ‘सितारे जमीन पर’मध्ये झळकणार असल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्याने बुधवारी ३ जून रोजी मुंबईत दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं होतं. अभिनेत्याची आई व बहीण निखत खान ‘सितारे जमीन पर’मध्ये झळकणार असल्याचं त्याने सांगितलं.

आमिरची बहीण निखत ही अभिनेत्री असून त्याची आई मात्र पहिल्यांदाच चित्रपटामध्ये झळकणार आहे. माध्यमांशी संवाद साधताना अभिनेत्याने हे सगळं कसं घडून आलं याबाबत सांगितलं. आमिर खान म्हणाला, “एरवी माझी आई कधीच म्हणत नाही की त्यांना माझ्याबरोबर चित्रपटाच्या सेटवर यायचं आहे वगैरे. पण, या चित्रपटाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणाच्या दिवशी सकाळी त्यांनी मला बोलावलं आणि म्हटलं, आज तुम्ही कुठे चित्रीकरण करत आहात? मला पण यायचं आहे. मी म्हणालो चला आणि मी त्यांच्यासाठी एक गाडी पाठवली; त्यानंतर माझी बहीण त्यांना चित्रपटाच्या सेटवर घेऊन आली.”

पुढे आमिर खान म्हणाला, “तेव्हा लग्नातील गाण्याचं चित्रीकरण सुरू होतं आणि आम्ही सर्व जण मज्जा करत त्याचं चित्रीकरण करत होतो आणि तेव्हा त्या आम्हाला पाहत होत्या.” चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक आर. एस. प्रसन्नने झीनत खान (आमिर खानच्या आई) चित्रपटाचा भाग होऊ शकतात का असं विचारल्याचं आमिर खानने सांगितलं आहे. अभिनेता म्हणाला, “प्रसन्न माझ्याकडे आला आणि जर तुम्हाला काही हरकत नसेल तर लग्नाच्या भागाचं चित्रीकरण सुरू असल्याने तुमच्या आई पाहुण्या म्हणून तिथे उपस्थित आहेत, असा एक शॉट देतील का असं विचारलं होतं. मी त्याला म्हटलं, तू वेडा आहेस का? माझी हिंमत नाही होणार त्यांना चित्रपटात काम कराल का असं विचारण्याची. त्या खूप हट्टी आहेत. त्या माझं ऐकणार नाही. तू तुझा वेळ वाया घालवू नकोस. पण, त्याने यासाठी माझ्याकडे आग्रह धरला, त्यामुळे मी आईला विचारलं की प्रसन्न अशी विनंती करत आहे की तुम्ही पाहुण्या म्हणून एक शॉट देऊ शकता का?”

आईने दिलेल्या प्रतिसादाबद्दल अभिनेता म्हणाला, “त्यांनी हो ठीक आहे, असं उत्तर दिलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं, त्यामुळे त्या चित्रपटातील दोन सीनमध्ये त्या पाहायला मिळणार आहेत. हा माझा एकमेव असा चित्रपट आहे, ज्यामध्ये माझ्या आईने काम केलं आहे.” पुढे बहिणीबद्दल बोलताना आमिर खान म्हणाला, त्याची बहीण चित्रपटातील काही भागांमध्ये झळकणार आहे. त्याने पहिल्यांदाच बहिणीबरोबर काम केलं आहे. पण, तीसुद्धा एक अभिनेत्री असल्याने भविष्यात पुन्हा कधीतरी एकत्र काम करू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्याची आई त्याच्या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच झळकणार असल्याने ही त्याच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असल्याचे त्याने सांगितलं आहे. आमिर खान म्हणाला, “मला माहीत नाही त्यांच्या मनात काय आलं आणि या चित्रपटात काम करण्यासाठी त्या तयार झाल्या. पण, त्या लवकरच ९१ वर्षांच्या होणार आहेत. १३ जूनला आमचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच्या एक आठवड्याआधी त्यांचा वाढदिवस आहे.”