ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरला सर्वत्र विरोध झाला आणि त्यानंतर या चित्रपटात काही बदल करण्यात आले. मात्र तरीही हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात निराशा झाल्याचं दिसत आहे. प्रेक्षक या चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त करत असतानाच काही कलाकारांनीदेखील या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मांडलं आहे. आता अभिनेत्री केतकी चितळे हिने या चित्रपटाबद्दल केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.
‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभासने प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली आहे, अभिनेत्री क्रिती सेनॉन ही सीतेच्या भूमिकेत दिसत आहे, तर हनुमानाची भूमिका मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे याने केली आहे. या चित्रपटाने दोन दिवसांतच भारतात १०० हून अधिक कोटींची कमाई केली. परंतु या चित्रपटावर प्रेक्षक जोरदार टीका करत आहेत. तर अभिनेत्री केतकी चितळेनेही या चित्रपटाबद्दलचं तिचं मत व्यक्त केलं आहे.
आणखी वाचा : केतकी चितळेला राग अनावर! ट्रोलरला शिवी देत म्हणाली, “तुमच्या पिढीला…”
केतकीने तिच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. यात तिने लिहिलं, “बऱ्याच लोकांनी मला विचारले की माझे आदिपुरुष या सिनेमाविषयी काय मत आहे. माझे मत : मी बघितलेला नाही त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही. पण ज्या चित्रपटाच्या टीझरमध्ये शिवभक्त रावण रुद्राक्ष तोडणार असेल तर मी तो चित्रपट बघणारही नाही. रावण एक शिवभक्त ब्राह्मण होते ज्यांनी सौराष्ट्रातील सोमनाथ मंदीर बांधले होते. सोमनाथ मंदीर अनेक वेळा पडले आहे आणि बऱ्याच राजांनी आणि एका राणीने ते पुन्हा बांधले आहे. त्यापैकी एक श्री रावणही आहेत.”

हेही वाचा : “तुमचा धर्म कमकुवत…” ट्रोल करणाऱ्याला केतकी चितळेचं उत्तर
पुढे ती म्हणाली, “रामायण हा घडलेला इतिहास आहे, फिरंगांनी ठरवलेले मिथ्य नाही. पुरावे आहेत रामायणाचे. नवी पिढी मूर्ख नाही की जे त्यांच्या नावावर बिल फाडून सारवासारव करणे चालू शकेल.” आता केतकीची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टवर कमेंट करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.