बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार व अभिनेता टायगर श्रॉफ हे सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘बडे मिया छोटे मिया’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. १० एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी दोघेही वेगवेगळ्या शहरांत जाऊन प्रमोशन करताना दिसत आहेत. अशातच लखनऊमध्ये प्रमोशनदरम्यान जमावाने गर्दीत दगडफेक केली आणि चपलादेखील फेकल्या.

सोमवारी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अक्षय आणि टायगर ‘बडे मिया छोटे मिया’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनऊला गेले होते. त्यांनी लाइव्ह स्टंट करून चित्रपटातील काही वस्तू भेट देऊन चाहत्यांचे मनोरंजन करण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे दोघांनी चाहत्यांच्या दिशेने मोफतच्या वस्तू (फ्रीबीज) फेकल्या. मोफतच्या वस्तू जमा करण्यासाठी सगळ्यांनी गर्दी केली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. माहितीनुसार, या गोंधळात जमावाने दगडफेक आणि चपलाफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा जवानांनी लाठीचार्ज केला. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

स्टंट करताना एका व्हिडीओमध्ये अक्षय आणि टायगर हुसेनाबादच्या क्लॉक टॉवरमध्ये तारांना लटकताना दिसले. तिथे चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. चाहत्यांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अक्षयनेही या कार्यक्रमात त्यांचे स्वागत केले. आणखी एका व्हिडीओमध्ये त्याने सर्वांना “ईद मुबारक” अशा शुभेच्छाही दिल्या.

अक्षय आणि टायगरच्या स्टंटबाजीदरम्यान जमावामध्ये मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली. स्टेजजवळ जाऊ पाहणाऱ्या गर्दीला रोखत सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. मोफतच्या वस्तू फेकल्यानंतर अक्षयने चाहत्यांना विनंती केली. तो म्हणाला, “मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो की, कृपया करून तुम्ही धक्काबुक्की करू नका. तुम्हाला भेटण्यासाठी, तुमच्याशी बोलण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. कृपया करून तुम्ही स्वत:कडे बघा, तुमच्या आजूबाजूला महिला आहेत, लहान मुले आहेत. त्यांची काळजी घ्या आणि कृपया गर्दी करू नका.”

लखनऊमधील या कार्यक्रमाचे व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याआधी अक्षय कुमारने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर लखनऊला आल्याची घोषणा करीत एक पोस्ट शेअर केली. त्याला कॅप्शन देत अक्षयने लिहिले, “पहिल्यांदा तुम्ही हसा! कारण- बडे आणि छोटे आता लखनऊमध्ये आले आहेत. क्लॉक टॉवर मैदानात आज दुपारी भेटू या.”

हेही वाचा… स्विगीच्या बेशिस्त वाहनचालकावर अभिनेता रोनित रॉय संतापला; पोस्ट शेअर करत म्हणाला, “तुम्हाला त्यांच्या जिवाची पर्वा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बडे मिया छोटे मिया’ चित्रपट अली अब्बास जफर दिग्दर्शित आणि जॅकी भगनानी, वाशू भगनानी, जफर, दीपशिखा देशमुख व हिमांशू किशन मेहरा निर्मित असून, या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकांत आहेत. पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया फर्नीचरवाला व रोनित रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यात आहेत.