अभिनेत्री आलिया भट्टने बॉलीवूडबरोबरच हॉलीवूड चित्रपट करीत जगभरात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आलिया आता फक्त अभिनेत्रीच नव्हे, तर निर्माती व उद्योजकदेखील आहे. करिअरच्या उच्चांकावर असतानाही आलियाने हिंदी सिनेसृष्टीतील ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण व प्रियांका चोप्रा या अभिनेत्री तिची प्रेरणा असल्याचे सांगितले.

‘फोर्ब्स ३०/५०’ला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली, “या तिघींचं मी मनापासून कौतुक करते. चित्रपटाचं कथानक आणि आपला अभिनय यांच्या जोरावर पात्र रंगलं पाहिजे आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्रींनी हे करून दाखवलंय. या अभिनेत्रींमुळे मला नेहमी प्रेरणा मिळते. ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण प्रियांका चोप्रा या अभिनेत्री तर आहेतच; पण त्या माझ्या चांगल्या मैत्रिणीही आहेत आणि मला त्यांचं खूप कौतुक वाटतं. त्यांनी अभिनय क्षेत्रातील अनेक गोष्टी आधीच सामान्य करून ठेवल्यामुळे याचं श्रेय मला त्यांना द्यावंसं वाटतं.”

हेही वाचा… “श्रीमंत मुलगी म्हणजे गोरी अन्…”, मनोरंजनसृष्टीत होणाऱ्या रंगभेदावर क्रांती रेडकरचं परखड मत; म्हणाली…

“आपण अशा काळात जगत आहोत; जिथे विविधता ही काळाची गरज आहे. जिथे तुम्हाला जगाच्या वेगवेगळ्या भागांतील वेगवेगळे चेहरे पाहायचे आहेत. वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलायचं आहे. पण, शेवटी तुमची गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचणं हे जास्त महत्त्वाचं. मग तुम्ही कुठून आलात, कोणत्या भाषेत बोलता या गोष्टींमुळे फरक पडत नाही.” असंही आलियानं नमूद केलं.

गेल्या वर्षी ‘कॉफी विथ करण’च्या एपिसोडमध्ये जेव्हा आलियाला विचारण्यात आलं होतं, “दीपिका पदुकोण तिची स्पर्धक आहे, असं तिला वाटतं का?” त्यावर आलिया म्हणाली होती, “अजिबात नाही. ती माझी स्पर्धक का असेल? दीपिका माझी सीनियर आहे आणि आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली कियारा अडवाणी; ‘या’ व्यक्तीबरोबर खास फोटो शेअर करत म्हणाली, “मला माझ्या…”

दरम्यान, आलियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर रणबीर कपूर व विकी कौशलबरोबर आलिया दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या ‘लव्ह अ‍ॅण्ड वॉर’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्याशिवाय ‘तख्त’ व ‘जिगरा’ या आगामी चित्रपटांमध्येही आलिया झळकणार आहे.