Dharmendra and First Wife Prakash Kaur Celebrates 71st Wedding Anniversary: अभिनेते बॉबी देओल हा सध्या ‘हाऊसफुल ५’ मधील त्याच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. आता मात्र त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे तो चर्चेत आला आहे.
बॉबी देओलचे वडील धर्मेंद्र व आई प्रकाश कौर यांच्या लग्नाचा आज ७१ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने बॉबी देओलने त्यांचा एक अनलीन फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
वयाच्या १९ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी केलेले लग्न
हा फोटो शेअर करताना बॉबी देओलने लिहिले, “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”, तसेच त्याने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. अभिनेत्याच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनी “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”, अशा कमेंट केला केल्या आहेत.
धर्मेंद्र व प्रकाश कौर यांचे १९५४ साली लग्न झाले होते. धर्मेंद्र यांचे वय त्यावेळी फक्त १९ वर्षे होते. या जोडप्याला चार मुले आहेत. दोन मुले म्हणजेच सनी व बॉबी देओल आणि अजीता व विजीता या दोन मुली आहेत. सनी व बॉबी देओल दोघेही वडीलांप्रमाणेच अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिका साकारत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
१९७० च्या दशकात धर्मेंद्र यांची भेट लोकप्रिय अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याबरोबर झाली. ‘तुम हसीन मैं जवान’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट झाली. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. तसेच, ते खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले. हेमा मालिनी यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या नात्याला विरोधही झाला. मात्र, कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता हेमा मालिनी व धर्मेंद्र यांनी १९८० साली लग्नगाठ बांधली. त्यांना ईशा व अहाना या दोन मुली आहेत.
धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल बोलायचे तर ते नुकतेच ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात काम करताना दिसले होते. शाहिद कपूर व क्रिती सेनॉन हेदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. ते श्रीराम राघवन यांच्या इक्किस या चित्रपटातदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. इक्किस या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त नंदादेखील दिसणार आहे.
दरम्यान, बॉबी देओलच्या कामाबद्दल बोलायचे तर तो ‘हाऊसफुल ५’या चित्रपटात दिसला होता. आता लवकरच वेलकम टू द जंगल या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबरोबरच, तो अल्फा या चित्रपटातदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शर्वरी वाघ व आलिया भट्ट या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.