सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा यांनी साखरपुडा केला आहे. दोघांनी खासगी सोहळ्यात कुटुंबीय व मोजक्याच मित्रांच्या उपस्थितीत इंगेजमेंट केली. दोघेही फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करणार असं म्हटलं जातंय. अद्याप विजय व रश्मिकाने याबाबत माहिती शेअर केलेली नाही.

२९ वर्षांची रश्मिका व ३६ वर्षांचा विजय दोघेही तेलुगू इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे. गीता गोविंदम, डियर कॉम्रेडसारखे सुपरहिट चित्रपट देणारे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. अखेर त्यांनी नातं पुढे नेण्याचा विचार केल्याची माहिती समोर येतेय. विजय देवरकोंडा व रश्मिका मंदाना या दोघांची संपत्ती किती? त्यांचे कार कलेक्शन व उत्पन्नाचे स्रोत याबद्दल जाणून घेऊयात.

रश्मिका मंदानाची संपत्ती

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना ६६ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. ती प्रत्येक चित्रपटासाठी ४ ते ८ कोटींदरम्यान मानधन घेते. पण ‘पुष्पा 2’ मध्ये श्रीवल्लीच्या भूमिकेसाठी तिला १० कोटी मानधन मिळालं होतं, असं म्हटलं जातं. याचबरोबर रश्मिका बोट, कल्याण ज्वेलर्स, मीशो, 7UP यांच्या जाहिरातीतून कमाई करते. रश्मिकाचा स्वतःचा डियर डायरी नावाचा परफ्यूम ब्रँडदेखील आहे.

रश्मिकाने मुंबई, हैदराबाद, गोवा, कूर्ग इथे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. तिचं कूर्गमध्ये आलिशान घर आहे. तसेच बंगळुरूजवळही तिचा ८ कोटी रुपयांचा बंगला आहे. रश्मिकाला लक्झरी कार्सची आवड आहे. तिच्याकडे मर्सिडीज-बेंझ सी-क्लास, एक टोयोटा इनोवा, एक ह्युंदाई क्रेटा, रेंज रोवर स्पोर्ट व एक ऑडी क्यू3 आहे.

विजय देवरकोंडाची संपत्ती किती?

विजय देवरकोंडा खूप लक्झरी आयुष्य जगतो. विजय हा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या तेलुगू स्टारपैकी एक आहे. तो एका चित्रपटासाठी जवळपास १५ कोटी रुपये मानधन घेतो. अनेक अहवालांनुसार, त्याची एकूण संपत्ती ५० ते ७० कोटींदरम्यान आहे.

विजय देवरकोंडाचे उत्पन्नाचे स्रोत

विजय देवरकोंडा चित्रपट, त्याचे फॅशन लेबल राउडी क्लब आणि व्हॉलीबॉल संघ यातून मोठी कमाई करतो. तो अनेक एंडोर्समेंट डीलमधूनही भरपूर पैसे कमावतो. हैदराबादमध्ये विजय देवेराकोंडाचा बहुमजली बंगला आहे. त्याची किंमत १५ कोटी रुपये आहे. १५ ऑक्टोबर २०१८ रोजी, त्याने त्याचा फॅशन ब्रँड लाँच केला आणि २०२० मध्ये मिंत्रावर राउडी वेअर लाँच केला. गेल्या काही वर्षांत या फॅशन ब्रँडची खूप भरभराट झाली आहे.

विजय देवरकोंडाचे कार कलेक्शन

विजय देवरकोंडाकडे ६१.४८ लाख रुपयांची बीएमडब्ल्यू 5 सीरिज आहे. तसेच ७५ लाखांची फोर्ड मस्टँग, ८५ लाखांची व्होल्वो XC90 आणि ६४ लाख रुपयांची रेंज रोव्हरही आहे.