बॉलीवूड अभिनेता अजय देवगण गेल्या तीन दशकांपासून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अजयच्या चित्रपटांची लोक आतुरतेने वाट पाहतात. तशीच त्याच्या बहुप्रतिक्षित ‘मैदान’ या चित्रपटाचीही गेली कित्येक वर्षं चर्चा आहे. गेली काही वर्षं अजयच्या आगामी ‘मैदान’ची लोक फार आतुरतेने वाट बघत आहेत परंतु प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने निर्माते त्याची प्रदर्शानाची तारीख पुढे ढकलताना दिसत आहेत.

वेगवेगळ्या कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. चित्रपट समीक्षण तरण आदर्श यांनी नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल माहिती दिली आहे. अजय देवगणचा ‘मैदान’ यंदा म्हणजेच २०२४ च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. तरण आदर्श यांनी ट्विटरवर याबद्दल पोस्ट करत माहिती दिली आहे. या पोस्टसह तरण यांनी चित्रपटाचे नवे पोस्टरही सादर केले आहे.

आणखी वाचा : राम मंदिरासाठी ‘हनुमान’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली ‘इतक्या’ कोटींची देणगी; ट्विटर पोस्टच्या माध्यमातून दिली माहिती

अजय देवगणचा हा चित्रपट एक बायोग्राफीकल स्पोर्ट्स ड्रामा आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली असून गेली कित्येक वर्षं ते या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मागे लागले आहेत. हा चित्रपट लांबणीवर पडल्याने बोनी कपूर यांनादेखील प्रचंड नुकसान झाल्याचं मध्यंतरी त्यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं. आता या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख निश्चित झाल्याने त्यांच्याही डोक्यावरचं एक ओझं कमी झालं आहे. भारतीय फुटबॉल संघाच्या सुवर्णकाळावर हा चित्रपट बेतलेला असून अजय देवगण यात फुटबॉल प्रशिक्षक सैयद अब्दुल रहीम यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

अजय देवगणच्या या चित्रपटाबरोबरच अक्षय कुमार टायगर श्रॉफ यांचा ‘छोटे मियां बड़े मियां’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे यंदाच्या ईदला बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडच्या दोन मोठ्या सुपरस्टार्समध्ये चांगलीच स्पर्धा पाहायला मिळणार आहे. आता बॉक्स ऑफिसवर नेमका कोणता चित्रपट प्रेक्षकांना तिकीटबारीवर खेचण्यात यशस्वी ठरतो ते येणारी वेळच ठरवेल. ‘मैदान’मध्ये अजय देवगणसह प्रियामणी, नितांशी गोयल, अमीर अली शेख, आर्यन भौमिक, अमर्त्य रे, मधुर मित्तल असे बरेच कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.