हृतिक रोशन बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. आतापर्यंत हृतिकने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. बॉलीवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणूनही त्याला ओळखले जाते. क्रिश, वॉर यांसारख्या अॅक्शन चित्रपटांमधील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. आता लवकरच हृतिकचा ‘फायटर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील हृतिक फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे.
हृतिक रोशनने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या ‘फायटर’ चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. हृतिक एअरफोर्स पायलटच्या गणवेशात दिसत आहे. या चित्रपटात हृतिक स्क्वॉड्रन लीडर ‘शमशेर पठानिया’ची भूमिका साकारणार असून, त्याला ‘पॅटी’ नावाने संबोधले जाणार आहे.
काही दिवसांपूर्वीच हृतिकने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत ‘फायटर’ चित्रपटाची पहिली झलक आणि रिलीज डेट जाहीर केली होती. या फोटोमध्ये हृतिक एअरफोर्स फायटरच्या गणवेशात दिसून आला होता. तसेच या फोटोमध्ये हृतिक फायटर प्लेनला हात लावून उभा असल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ‘फायटर’ चित्रपटाचे बजेट जवळपास २५० कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात हृतिक रोशनबरोबर दीपिका पदुकोण, अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.