गाझा पट्टीतील सत्ताधारी ‘हमास’ या दहशतवादी गटाने शनिवारी अचानक इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यात १०० जण ठार झाले. या ‘हमास’च्या हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल इस्रायलने गाझा पट्टीवर अनेक हवाई हल्ले केले. यामध्ये १९८ नागरिक ठार झाल्याचा दावा पॅलेस्टिनने केला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्ष वाढला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांनी थेट युद्धाची घोषणा केली आहे. अशा या संघर्षमय परिस्थितीत इस्रायलमध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा अडकल्याचं समोर आलं होतं. तिच्याशी संपर्क होत नसल्याचं तिच्या टीमकडून सांगण्यात आलं होतं. पण आता नुसरतच्या आईने ती सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा – हमासकडून इस्रायलवर ५ हजार रॉकेट्सचा हल्ला, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची प्रतिक्र…
‘टाइम्स नाउ’ या वृत्तसंस्थेशी बोलताना नुसरतची आई तस्नीम भरुचा म्हणाल्या, “माझी मुलगी सुरक्षितपणे भारतात परतत आहे. आम्ही खूप आनंदी आहोत.” माहितीनुसार, नुसरत इतर भारतीयांबरोबर तेल अवीव येथून येत आहे. सर्वात आधी ती दुबईला रवाना होईल आणि त्यानंतर तिथून ती मुंबईला उड्डाण करेल.
हेही वाचा – Israel-Palestine Conflict : मृतांचा आकडा वाढला; हमासकडून इस्रायल नागरिक कैद, गाझापट्ट…
नुसरतच्या टीममधील संचिता त्रिवेदी म्हणाली, “आम्ही अखेर नुसरतशी संपर्क साधण्यात यशस्वी झालो आहोत. दुतावासाच्या मदतीने तिला सुरक्षितपणे घरी आणले जात आहे. आम्हाला थेट विमान मिळाले नसून आम्ही तिला कनेक्टिंग विमानाने भारतात परत आणत आहोत. सुरक्षितेच्या कारणास्तव अधिक माहिती देता येणार नाही. पण ती भारतात परताच आम्ही तुम्हाला कळवू. तिच्याशी संपर्क झाल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. नुसरत सुरक्षित भारतात येत आहे, याबद्दल देवाचे आभार मानते.”