Preity Zinta Reveals Her First Love Died: प्रीती झिंटा ही बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. १९९८ मध्ये अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘दिल से’ हा तिचा पहिला चित्रपट होता.
‘दिल चाहता है’, ‘क्या कहना’, ‘ये रास्ते है प्यार के’, ‘फर्ज’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘कोई मिल गया’, अशा अनेक चित्रपटांसाठी अभिनेत्री ओळखली जाते. मात्र, तिचा ‘कल हो ना हो’ हा चित्रपट आजही लोकप्रिय आहे. या चित्रपटात शाहरुख खान, सैफ अली खान, जया बच्चन, सोनाली बेंद्रे असे अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत होते.
प्रीती झिंटाच्या बॉयफ्रेंडचा अपघातात झालेला मृत्यू
‘कल हो ना हो’ हा चित्रपटातील नैना, अमन व रोहित यांची ही गोष्ट प्रेक्षकांना भारावून टाकते. नैनाचे पहिले प्रेम अमनचे निधन झाले होते. त्यानंतर रोहित व नैना लग्न करतात. पण, त्यांच्या मनात अमनच्या आठवणी शेवटपर्यंत राहतात. अशा आशयाची गोष्ट पाहायला मिळाली. मात्र, चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही प्रीतीने तिचे पहिले प्रेम गमावले आहे. अभिनेत्रीने नुकतेच एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतेले.
यामध्ये एका चाहत्याने तिला विचारले की इतक्या वर्षांनंतरही ती ‘कल हो ना हो’ पाहताना प्रेक्षकांप्रमाणेच अजूनही रडते का? या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एक हृदयस्पर्शी घटनादेखील सांगितली. अभिनेत्रीने लिहिले, “हो, मी हा चित्रपट पाहताना आजही रडते. या चित्रपटाचे जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो त्यावेळी देखील मी रडले होते. माझे ज्या मुलावर प्रेम होते, त्याचा कार अपघातात मृत्यू झाला होता. माझे पहिले प्रेम गमावले आहे. त्यामुळे हा चित्रपट इतर चित्रपटापेक्षा वेगळा ठरतो.”
पुढे अभिनेत्रीने लिहिले, “गमतीची गोष्ट अशी की या चित्रपटाच्या अनेक सीनमध्ये सर्वच कलाकार खरोखरच रडत होते. अमनच्या मृत्यूच्या सीनचे जेव्हा शूटिंग केले जात होते. त्यावेळी कॅमेरात दिसणारे आणि कॅमेरामागचे सर्वच कलाकार रडत होते.”
याआधीदेखील या चित्रपटात डेलनाज इराणीदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसली होती. अभिनेत्रीने एका मुलाखतीत, प्रीतीप्रमाणेच सर्व कलाकार अमनच्या मृत्यूच्या सीनवेळी खरोखरच रडल्याचे म्हटले होते.
दरम्यान, प्रीती झिंटा ही बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्री आहे. तिने शानदार अमरोही यांची ६०० कोटींची संपत्ती नाकारली होती. तसेच मुंबईच्या गँगस्टर विरोधात न्यायालयात साक्ष दिली होती. त्यामुळेदेखील तिची मोठी चर्चा झाली होती. अभिनेत्री सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते.