Priya Gill recalls slapping Shah Rukh Khan : ९० च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपट आणि गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे ‘पहली पहली बार मोहब्बत की है’ हे होय. हे गाणं आजही अनेकदा ऐकायला मिळतं. ‘सिर्फ तुम’ चित्रपटातील या गाण्याबरोबरच ‘दिलबर दिलबर’ सारखी गाणीही हिट झाली होती. या सिनेमातील मुख्य अभिनेत्रीचं नाव प्रिया गिल. प्रेक्षकांना तिचा साधेपणा खूप आवडला होता. त्यानंतर ती शाहरुख खानबरोबर ‘जोश’ चित्रपटात झळकली होती. मोठ्या स्टार्सबरोबर काम करणाऱ्या या अभिनेत्रीचं फिल्मी करिअर फार लहान होतं. ती मागील १८ वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे.

प्रिया गिलने एकदा दिलेल्या मुलाखतीत ‘जोश’ चित्रपटाबद्दलचा शाहरुख खानशी संबंधित किस्सा सांगितला होता. हा चित्रपट रिलीज होऊन २५ वर्षांहून जास्त काळ झाला आहे, पण अभिनेत्रीला एका गोष्टीचा अजूनही पश्चाताप आहे, तो तिच्या आयुष्यातील सर्वात लाजिरवाणा प्रसंग होता, असं ती म्हणाली होती. कारण प्रियाने सेटवर शाहरुख खानला झापड मारली होती.

नेमकं काय घडलं होतं?

“माझ्या पूर्ण फिल्मी करिअरमधील सर्वात लाजिरवाणं काम ते होतं जेव्हा मी शाहरुख खानला झापड मारली होती. जोशमध्ये माझं व शाहरुख खानचं एक गाणं होतं, गाण्याच्या सुरुवातीला मी शाहरुखला झापड मारायची होती. आम्ही गोव्यात या सीनचे खूप रिटेक्स केले होते. मन्सूर मला म्हणत होते प्रिया, मुलगी चिडलीये आणि जोरात झापड मारतेय असं वाटत नाहीये. मी म्हटलं ठिके आणि मी प्रयत्न करत राहिले. त्याचदरम्यान शाहरुख मला म्हणाला, “मला मार, मला मार” मन्सूरही मला वारंवार त्याला मारायला सांगत होते, त्यामुळे मी जोरात त्याच्या थोबाडीत मारली, हा माझ्या आयुष्यातील सर्वात लाजिरवाणा प्रसंग होता. मी हा प्रसंग कधीच विसरणार नाही,” असं प्रिया म्हणाली होती.

प्रियाने शाहरुखला मारल्यावर सेटवर पसरलेली शांतता

प्रिया पुढे म्हणालेली, “सेटवर अचानक शांतता पसरली होती. फक्त कॅमेरा चालू होता, बाकी सगळे स्तब्ध झाले होते. माझ्या रिअॅक्शनमुळे दिग्दर्शक कट म्हणायला विसरले होते. मला आठवतं, त्यावेळी कॅमेरामन मला म्हणाला होता की मुली तुझा द्वेष करतील, कारण तू शाहरुख खानला मारलंय.” दरम्यान, प्रियाने शाहरुखचं कौतुकही केलं होतं. “मला वाटतं ते खूप चांगले आहेत, कारण तो सीन चांगल्या पद्धतीने कसा होईल, तेच ते मला समजावून सांगत होते आणि मला कळत नव्हतं की काय करावं. त्यानंतर गाणं सुरू होतं, त्यामुळे मी किती तणावात याची कल्पना करा. दुसरीकडे शाहरुख एकदम शांत होते,” असं प्रिया गिलने म्हटलं होतं.

शाहरुख खानबद्दल काय म्हणालेली प्रिया गिल?

“तुम्हाला माहीत आहे की नाही, याची मला कल्पना नाही, पण मी फक्त त्याची एक चाहती असं म्हणणार नाही. कारण चाहते अभिनयाचे असतात. मला शाहरुख खान आवडतात, मी शिकत असताना त्यांना टीव्हीवर पाहायचे, ते मालिका करून नंतर स्टार झाले. मला कधीच वाटलं नव्हतं की त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळेल,” असं प्रिया गिल म्हणाली होती.

प्रिया गिलचे चित्रपट

९ एप्रिल १९९७७ रोजी जन्मलेल्या प्रिया गिलने १९९६ साली आलेल्या ‘तेरे मेरे सपने’ सिनेमातून करिअरची सुरुवात केली होती. यात तिच्याबरोबर अरशद वारसी मुख्य भूमिकेत होता. यानंतर तिने ‘दिल दीवाना माने ना’, ‘सिर्फ तुम’, ‘जोश’, ‘मुझे कुछ कहना है’ हे चित्रपट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदी चित्रपटांमध्ये फार यश न मिळाल्याने प्रिया दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे वळली. तिने मल्याळम चित्रपट ‘मेघम’ केला होता. तसेच तिने भोजपुरी सिनेमाही केला. पण तरीही तिच्या करिअरला फार फायदा झाला नाही. तिचं फिल्मी करिअर १० वर्षांचं राहिलं. ती शेवटची २००६ मध्ये ‘भैरवी’ चित्रपटात झळकली होती. त्यानंतर ती सिनेसृष्टीतून गायब झाली. आता ती परदेशात राहते, असं म्हटलं जातंय.