राम गोपाल वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारे राम गोपाल वर्मा वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत राहिले. अनेक अभिनेत्रींबरोबर त्यांचं नाव जोडलं गेलं. अफेअर्स व लिंकअपच्या बातम्याही आल्या. त्यांचं नाव लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकरबरोबर जोडलं गेलं होतं. जेव्हा त्यांच्या पत्नीला याबद्दल कळलं तेव्हा त्यांनी अभिनेत्रीला झापड मारली होती, असं म्हटलं जातं.
राम गोपाल वर्मा व उर्मिला मातोंडकर यांच्या अफेअरच्या बातम्या तेव्हा खूप वेगाने पसरत होत्या. राम गोपाल वर्मा यांच्यामुळे उर्मिलाचे करिअरही उद्ध्वस्त झाले, असं म्हटलं गेलं जातं. कारण ते उर्मिलाला त्यांच्या जवळजवळ सर्व चित्रपटांमध्ये घेत होते. ‘रंगीला’ चित्रपटाने उर्मिलाला स्टार बनवलं आणि हा चित्रपट राम गोपाल वर्मा यांचाच होता. राम व उर्मिला यांच्या वाढत्या जवळीकीच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत होत्या. या बातम्या राम यांच्या पत्नीपर्यंतही पोहोचल्या. जेव्हा राम गोपाल वर्मा यांची पत्नी रत्ना यांना उर्मिलाबद्दल कळलं तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला.
अफेअरमुळे राम गोपाल वर्मा यांचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झालं. उर्मिलावर रत्ना इतकं चिडल्या होत्या की त्यांनी तिच्या कानशिलात लगावली होती. यानंतर रत्ना व राम गोपाल वर्मा यांचं लग्नही मोडलं. इतकंच नाही तर या घटनेमुळे राम गोपाल वर्मा यांच्या फिल्मी करिअरवरही मोठा परिणाम झाला.
राम गोपाल वर्मा उर्मिलाबद्दल म्हणालेले…
राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ‘गन्स अँड थाईज: द स्टोरी ऑफ माय लाईफ’ या आत्मचरित्रात उर्मिलाबरोबरच्या त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. राम यांनी ‘वुमन इन माय लाईफ’ या अध्यायात उर्मिलाबद्दल लिहिलं आहे.

“चित्रपटसृष्टीत आल्यानंतर, माझ्यावर प्रभाव पाडणारी पहिली मुलगी उर्मिला मातोंडकर होती. उर्मिलाच्या सौंदर्याने मी मंत्रमुग्ध झालो होतो. तिच्या चेहऱ्यापासून ते तिच्या फिगरपर्यंत… तिच्याबद्दल सर्व गोष्टी खास होत्या. ‘रंगीला’पूर्वी तिने काही चित्रपट केले होते, जे चांगले चालले नाहीत आणि प्रेक्षकांवर त्याचा फारसा प्रभाव पडला नाही,” असं राम गोपाल वर्मा यांनी पुस्तकात लिहिलं आहे.
उर्मिलाने राम गोपाल वर्मा यांच्या सत्या, कौन, जंगल, मस्त, दौड़ व भूत या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने मोहसीन अख्तरशी लग्न केलं होतं, पण २०२४ मध्ये तिचा घटस्फोट झाला.