९० च्या दशकात चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रवीना टंडन आजही चांगलीच चर्चेत असते. त्या काळातील ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये रवीनाचं नाव हमखास घेतलं जायचं. आताही काही चित्रपट आणि वेबसीरिजमधून रवीनाने उत्तम काम करत स्वतःला पुन्हा सिद्ध केलं आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान तिने ९० च्या दशकातील चित्रपटसृष्टीतील काही गोष्टींवर भाष्य केलं आहे.
चित्रपटसृष्टीत होणारं बॉडी शेमिंग किंवा कीसिंग किंवा रेप सीन दरम्यान तिने घातलेली अट यावर रवीनाने भाष्य केलं आहे. याबरोबरच रवीनाने सध्या देशातील काही गंभीर मुद्द्यांवर आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंगवरही भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर मत व्यक्त करणाऱ्याला सरसकट डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचा आहे असं सांगून शिक्का मारला जातो असं रवीनाने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
आणखी वाचा : नाना पाटेकरांनी नाकारली ‘या’ सुपरहीट हॉलिवूड चित्रपटाची ऑफर; अनुराग कश्यपने सांगितलं कारण
‘एएनआय’शी संवाद साधताना रवीना म्हणाली, “तुम्ही मत व्यक्त केलं तरी प्रॉब्लेम नाही केलं तरी प्रॉब्लेम. माझ्यामते ट्विटर हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे दोन गटात विभागला गेला आहे. सगळ्यांचे विचार फार कलुषित झाले आहेत तुम्ही एक तर उजव्या विचारांचे आहात किंवा डाव्या विचारांचे आहात, याचाच अर्थ तुम्ही एकतर संघी आहात किंवा नक्षलवादी आहात. तुमच्याकडे मधला कोणताच मार्ग ठेवलेला नाही, पण जेव्हा माझ्या देशाचा प्रश्न जिथे येतो तिथे मी कोणचीही भीड न बाळगता बोलते.”
सोशल मीडियावर स्वतःचे विचार व्यक्त केल्यावरही रवीनाला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्याविषयी बोलताना रवीना म्हणाली, “तू अभिनयच कर, तुला काय ठाऊक अशा बऱ्याच कॉमेंट मला येतात. मी या देशाची नागरिक नाही का? या देशात राहून मी माझा टॅक्स भरत नाही का? एक अभिनेत्री असले तरी तुम्ही माझ्याकडून एक मूलभूत हक्क कसा हिसकावू शकता?” अशाप्रकारे भाष्य करत रवीनाने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिलं आहे. रवीना नुकतीच ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटात झळकली. शिवाय तिची ‘अरण्यक’ ही वेबसीरिजसुद्धा चांगलीच गाजली.