अक्षय कुमार ‘हेरा फेरी ३’मधून बाहेर पडल्याने सगळेच चाहते चांगले नाराज झाले आहेत. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान आपल्याला काही गोष्ट पटल्या नाहीत म्हणून त्यातून बाहेर पडल्याचं अक्षयने कबूल केलं तर काही लोक अक्षयच्या मानधनामुळे त्याला चित्रपट सोडावा लागला असं म्हणत आहेत. ‘हेरा फेरी’ यातील शाम, बाबुराव आणि राजू ही जोडी प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहे.

या नवीन भागात बाबुराव आणि शाम म्हणजेच परेश रावल आणि सुनील शेट्टी दिसणार आहेत, पण राजूची भूमिका अभिनेता कार्तिक आर्यन करणार असल्याचं स्पष्ट झालं. नुकतंच याविषयी सुनील शेट्टीनेही मौन सोडलं. अक्षयच्या चित्रपट सोडून जाण्याचं ऐकल्याने त्याला चांगलाच धक्का बसला. निर्माते फिरोज यांच्याशी बोलून याविषयी तो जाणून घेणार होता असं सुनील शेट्टीने स्पष्ट केलं. आता सुनीलने यावर आणखी स्पष्टीकरण दिलं आहे.

आणखी वाचा : आमिरच नव्हे तर या कलाकारांनीदेखील घेतला होता अभिनयातून ब्रेक; नंतर केला जोरदार कमबॅक

कार्तिक आर्यन हा ‘हेरा फेरी ३’मध्ये राजूला म्हणजेच अक्षय कुमारला रीप्लेस करणार नसल्याचा सुनील शेट्टीने स्पष्ट केलं आहे. काही महितीशीर सुत्रांनुसार बॉलिवूड हंगामाशी संवाद साधताना सुनील शेट्टीने हे स्पष्टीकरण दिल्याचं समोर येत आहे. याविषयी सुनील शेट्टी म्हणाला, “अक्षय पुन्हा चित्रपटात येणं ही खरंच फार उत्तम गोष्ट असेल. अक्षय ऐवजी चित्रपटात कार्तिकची वर्णी लागली आहे या सगळ्या अफवा आहेत. अक्षयची जागा कुणीच घेऊ शकत नाही. चित्रपटाचे निर्माते कार्तिकशी वेगळ्या भूमिकेबद्दल चर्चा करत आहेत. यात कसलाच वाद नाही हे नक्की.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनील शेट्टी हा सध्या त्याच्या आगामी ‘धारावी बँक’ या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे त्याला निर्मात्यांशी बोलायला वेळ मिळत नाहीये. पण लवकरच तो निर्मात्यांची भेट घेऊन हा सगळा गोंधळ दूर करायचा प्रयत्न करणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या तिघांशिवाय हा चित्रपट बनूच शकत नाही आणि बनला तरी तो आम्ही बघणार नाही असा पवित्रा सध्या चाहत्यांनी घेतला आहे. अजूनतरी या सगळ्या गोष्टी चर्चेपुरत्याच मर्यादित आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी यावर अजूनही अधिकृत भाष्य केलेलं नाही.