प्रसिद्ध अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हल्ली खूप चर्चेत असतात. अनेकदा त्या इंडस्ट्रीतील लोकांबद्दल, तर कधी गोविंदाबद्दलही स्पष्ट वक्तव्य करत असतात. अशातच आता नुकतच सुनीता यांनी एका मुलाखतीमध्ये बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवनबद्दल वक्तव्य केलं आहे. सुनीता यांनी गोविंदाबरोबर वरुण धवनची तुलना करू नका असं म्हटलं आहे.
सुनीता आहुजा यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये वरुण धवनबद्दल वक्तव्य केलं आहे. गोविंदा व वरुण धवन यांच्याबद्दल अनेकदा प्रेक्षकांमध्ये चर्चा केली जाते. गोविंदा हा वरुण धवनच्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे, असं वरुणनेच एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. अशातच आता सुनीता यांनी वरुण धवन व गोविंदा यांच्यामध्ये होणाऱ्या तुलनेबद्दल वक्तव्य केलं आहे. ‘इन्स्टंट बॉलीवूड’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनीता यांना “वरुण धवनला एका मुलाखतीमध्ये एका कलाकाराचं आयुष्य तुला जगायचं असेल तर तो कोण असेल असा प्रश्न विचारला गेला होता; यावर वरुणने गोविंदाचं नाव घेतलं होतं, कारण वरुण धवन गोविंदाचा खूप मोठा चाहता आहे,” असं सांगण्यात आलं.
वरुणबद्दल बोलताना सुनीता म्हणाल्या, “वरुणला आम्ही तो खूप लहान असल्यापासून पाहात आहोत आणि गोविंदा नेहमी त्याच्या वडिलांना म्हणायचा की डेविड, हा तुझा मुलगा एक दिवस सुपरस्टार होईल.” सुनीता वरुणबद्दल पुढे म्हणाल्या, “कारण वरुण जेव्हा शूटिंगच्या सेटवर यायचा, तेव्हा तो सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत असे. सेटवर गोविंदा असो किंवा सलमान खान, तो नेहमी प्रत्येक गोष्ट नीट बघत असे; त्याला या सर्व गोष्टींबाबत फार कुतूहल असायचं. पण मला असं वाटतं की, वरुण धवनची गोविंदाबरोबर तुलना करू नका. वरुण अजून लहान आहे, लगेच एका मुलाची अशी तुलना करणं योग्य नाही. कारण वरुण धवन वेगळा आहे, त्याचं स्वत:चं असं एक वेगळेपण आहे.”
“वरुणलाही कधी कधी वाईट वाटत असेल, जेव्हा त्याची कोणाबरोबर तुलना केली जात असेल. जसं मला माझ्या मुलाची कोणी गोविंदाबरोबर तुलना केलेली आवडत नाही, तसंच मला वरुणबद्दलही वाटतं.” सुनीता पुढे म्हणाल्या, “मी यशला (गोविंदा व सुनीता यांचा मुलगा) हेच सांगत असते की तू गोविंदासारखं हुबेहूब काम करायला जाऊ नकोस, नाही तर लोक बोलतील वडिलांसारखंच काम करतोय, स्वत:चं काही वेगळेपण नाहीये.”