Shefali Jariwala Latest News: ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाचं (Shefali Jariwala Death) हृदविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ती ४२ वर्षांची होती. १९ व्या वर्षी ‘कांटा लगा’ या म्युझिक व्हिडीओतून लोकप्रियता मिळाल्यावर ती घराघरांत ओळखली जाऊ लागली. शेफाली जरीवालाचं वैयक्तिक आयुष्य खूप चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. तिला आई होऊ न शकल्याची खंत होती.
शेफाली जरीवालाच्या पतीचं नाव पराग त्यागी आहे. ‘पवित्र रिश्ता’ फेम पराग त्यागी व शेफालीने २०१४ साली लग्न केलं. लग्न करण्यापूर्वी दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे आणि तिथले खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचे. शेफालीचे लाखो चाहते आहेत.
शेफाली जरीवालाच्या लग्नाला ११ वर्षे झाली होती, पण तिला बाळ नव्हतं. आई न होऊ शकण्याबद्दल एकदा ती व्यक्त झाली होती. पारस छाबराच्या शोमध्ये शेफाली जरीवालाला बाळाबद्दल विचारण्यात आलं होतं. “मूल जन्माला कुणीली घालू शकतं, पण मला वाटतं की जगात अशी अनेक मुलं आहेत ज्यांना घराची गरज आहे, प्रेमाची गरज आहे. प्रत्येकजण आपल्या मुलांवर प्रेम करतो, पण जो दुसऱ्याच्या मुलाला आपल्या घरात आणतो आणि त्याचे पालनपोषण करतो तो सर्वात महान आहे. वयाच्या १२-१३ व्या वर्षी जेव्हा मला मूल दत्तक घेणं ही गोष्ट समजली तेव्हापासूनच माझ्या मनात मूल दत्तक घेण्याचा विचार आला होता,” असं शेफाली म्हणाली होती.
बाळ दत्तक घेण्याच्या प्रक्रियेबद्दल शेफाली जरीवाला काय म्हणाली होती?
“बाळ दत्तक घेण्याच्या निर्णयात तुम्हाला पती व तुमच्या कुटुंबियांचाही पूर्ण पाठिंबा असावा लागतो. आमच्या घरात मूल दत्तक घ्यायला सगळे तयार आहेत, पण मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया इतकी मोठी असते की त्या काळात मुलं मोठी होतात. प्रत्येकाला लहान मूल हवं असतं. पराग आणि मी खूप दिवसांपासून मूल दत्तक घेण्याचा विचार करत होतो, पण ते शक्य होत नाहीये. दुसरं म्हणजे माझ्या आणि परागच्या वयात खूप अंतर आहे,” असं शेफालीने म्हटलं होतं.

पराग व शेफालीच्या वयातील अंतर
शेफाली जरीवाला ही ४२ वर्षांची होती. तर तिचा पती पराग ४९ वर्षांचा आहे. दोघांच्या वयात सात वर्षांचे अंतर आहे. “माझ्या व माझ्या पतीच्या वयातील अंतरामुळे मला आई होण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आम्ही सर्व प्रयत्न करून थकलो आहोत. आता वाटतं की जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हाच आमच्या घरी नवीन पाहुणा येईल,” असं शेफाली म्हणाली होती. दरम्यान, आता शेफालीच्या निधनाची बातमी आल्याने चाहते हळहळ व्यक्त करत आहे. इंडस्ट्रीतील कलाकारांनाही तिच्या निधनाचा धक्का बसला आहे.