‘द सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ने रुची नरैनच्या ‘हनुमान दा दमदार’ या सिनेमातील अनेक दृश्यांमध्ये कट सुचवून यू/ए प्रमाणपत्र दिले आहे. या सिनेमात सलमान खानने हनुमान या व्यक्तिरेखेला आवाज दिला आहे.

सीबीएफसीचे प्रमुख पहलाज निहलानी यांनी स्पष्ट केले की, ‘सर्वसाधारणपणे अॅनिमेटेड सिनेमे, त्यातही पौराणिक कथांवर आधारित सिनेमांना हिरवा कंदिल दाखवला जातो. पण या सिनेमात मुलांना उद्देशून असे अनेक संवाद आहेत जे पाहून काहींच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. एका वृत्तपत्राने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

तरुण वर्गाला या सिनेमाकडे आकर्षित करण्यासाठी अशा पद्धतीची भाषा सिनेमात ठेवण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण सिनेमाच्या निर्मात्यांनी दिले. पण त्यांच्या या स्पष्टीकरणाचा निहलानी यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही. ‘सिनेमात वापरण्यात आलेली भाषा जरी तरुणाईला आकर्षित करण्यासाठी असली तरी प्रत्येक व्यक्ती त्या भाषेचा समान अर्थ घेईल असे नाही. धार्मिक गोष्टींबद्दल अत्यंत सावध असण्याची गरज आहे. नंतर माफी मागण्यापेक्षा आधीच सुरक्षितता बाळगलेली केव्हाही चांगली. त्यामुळेच सिनेमातले काही संवाद वगळण्यात आले आहेत,’ असे मत त्यांनी मांडले. एवढंच बोलून ते थांबले नाहीत तर, ‘मुलं त्यांच्या पालकांसोबत येऊन सिनेमा पाहू शकतात. मग समस्या काय आहे?’ असा प्रश्न विचारला.

परिणीती, का खोट बोलते आहेस? फेसबुकच्या माध्यमातून वर्गमित्राचा सवाल

‘हनुमान दा दमदार’ या अॅनेमेटेड सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. हनुमानाव्यतिरिक्त अन्य पात्रांचीदेखील या ट्रेलरमध्ये झलक पाहावयास मिळते. ट्रेलरमध्ये सर्व पात्रांना आधुनिक आणि विनोदी अंगाने दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. ट्रेलरची सुरुवातही बोमन इराणी यांच्या आवाजाने करण्यात आली आहे. सलमानशिवाय जावेद अख्तर, रविना टंडन, मकरंद देशपांडे, विनय पाठक, सौरभ शुक्ला, चंकी पांडे आणि कुणाल खेमू या कलाकारांनी अॅनिमेटेड पात्रांसाठी आवाज दिला आहे.